भाज्यांची भाववाढ, सामान्यांच्या खिशाला कात्री, वाचा कोणती भाजी कितीला?

पावसामुळे भाज्यांच्या दरात 20 टक्के वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : लहरी पावसाचा फटका बाजारातील भाज्यांच्या दरांवर झालाय. भाज्यांचे दर कडाडले असून त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यताय. शनिवारी बेळगावात कांद्याचे दर अचानक वाढले होते. त्यानंतर आता राज्यातही कांदा महागलाय. सोबतच इतरही भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. जवळपास वीस टक्क्यांनी भाज्यांचे दर कडाडलेत. नव्या कृषी कायद्यामुळे भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता असतानाच अनियमित पावसाचा फटका भाज्यांच्या किंमतीवर होताना पाहायला मिळतोय.

कोणत्या भाज्यांचे दर किती?

राज्याशेजारी महाराष्ट्र आणि कर्नाटकात मुसळधार पाऊस झाल्यानं तिथल्या पिकांना याचा फटका बसलाय. पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झालंय. परिणाम भाज्यांचे दरही वाढलेत.

गवार – आधी 60 रुपये किलो, आता 80 रुपये किलो
वालपापडी – आताची किंमत 80 रुपये किलो
कोबी – आधीची किंमत 30, आता 40 रुपये किलो
टोमॅटो – 40 ते 50 रुपये किलो
बटाटा – 40 ते 50 रुपये किलो
बेळगावी भेंडी – 80 रुपये प्रतिकिलो

शनिवारच्या किंमती
टोमॅटे – 40 रुपये किलो
कांदा – 64 रुपये किलो
बटाटा – 43 रुपये किलो
हिरवी मिरची – 39 रुपये किलो
कोबी – 50 रुपये किलो
भेंडी – 52 रुपये किलो
गाजर – 42 रुपये किलो

इतर भाज्यांच्या या तुलनेत मिरच्या आणि लिंबाचे दर स्थिर आहेत. मिरचीचा दर 40 रुपये प्रतिकिलो असा आहे. येत्या काही दिवसांत भाज्यांची आवक वाढली नाही, तर हे दर आणखी वाढण्याची शक्यताय.

बजेट कोलमडलं!

सर्वसामान्य गोवेकरांना महागाईची झळ बसू नये, यासाठी फलोत्पादन महामंडळातर्फे स्वस्तात भाजी उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जाते. मात्र, ही योजना महागाईची झळ पोहोचण्यापासून वाचवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा सूर उमटू लागलाय.

सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक उद्योगही बंद पडलेत. त्यामुळे उत्पन्न घटलंय. अशा काळात फलोत्पादन मंडळाने स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, बाजारभावापेक्षा 4 ते 5 रुपये कमी करून भाजीपाला विकला जात आहे. विशेष म्हणजे, या भाजीपाल्याची गुणवत्ताही निकृष्ट असते. या कारणांनी सामान्य गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!