गोवा उजळणार सौर ऊर्जेच्या प्रकाशाने

पथदीपांनाही होणार सौर ऊर्जेचा वीजपुरवठा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : तमनार विद्युत प्रकल्पातून वीज आणण्याच्या विषयावरून राज्यात वातावरण तापलंय. मात्र सरकारनं विजेच्या बाबतीत आणखी एक चांगला उपक्रम राबवताना सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील 6 हजार 300 कृषी पंप आणि 16 लाख एलईडी पथदीपांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवलंय.

या प्रकल्पासाठी सरकारी जमिनीत शंभर मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येतील. त्याचा पहिला टप्पा म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणांत करार करण्यात आला. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

करारावर स्वाक्षऱ्या…

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालय (डीएनआरई) गोवा अंतर्गत सार्वजनिक प्रकल्पांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल)ने नव्यानेच स्थापित झालेल्या कन्वर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचा (कन्वर्जन्स) प्रकल्प गोव्यात राबवण्याविषयक पुढील चर्चा करण्यासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री आर.के. सिंह, गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल, वीज खात्याचे सचिव संजीव नंदन सहाय याच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सिंचन पंपांसाठी वापर…

या सहकार्य करारानुसार, ईईएसएल आणि डीएनआरईद्वारे राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याविषयक अभ्यास करणे आणि त्यानुसार या प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. ईईएसएल आपल्या 100 टक्के स्वमालकीच्या व नव्यानेच स्थापित करण्यात आलेल्या कन्वर्जन्स एनर्जी सर्व्हिसेसच्या माध्यमातून शासकीय जमिनींवर 100 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पांचा उपयोग प्रामुख्याने सिंचन पंपांसाठी करण्यात येणार असून यामुळे 6300 बीईई तारांकित कृषिपंपांची जागा हा प्रकल्प घेईल त्याचबरोबर ग्रामीण भागातील 16 लाख एलईडी बल्बनाही वीजपुरवठा करू शकणार आहे.

कृषी, ग्रामीण भागातील वीज वापराला येणार गती

या प्रकल्पांमुळे विशेषतः राज्यातील कृषी व ग्रामीण भागातील वीज वापराला गती येणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे पंपिंग आणि लायटिंग यंत्रणेच्या वापरामुळे कमाल ऊर्जा मागणीचा स्तर कमी राखण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या व्यापक उपक्रमाअंतर्गत कन्वर्जन्सद्वारे ग्रामपंचायत, वीज मंडळाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या रिकाम्या, विनावापर जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. उपकेंद्रांजवळ 500 किलोवॉट ते 2 मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारले जातील आणि यामुळे दिवसा वीजविरण करणे आणि वितरणातील नुकसान कमी करणे वीज वितरण महामंडळांना शक्य होणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!