60 सदस्यांच्या 6 झोपड्यांना सौर उर्जाचे दिवे व शैक्षणिक साहित्य, नवचेतना युवक संघाचा उपक्रम

या घटकांपर्यंत सरकार का पोहोचत नाही?

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : मालपे पेडणे येथील डोंगर माळरानावर चार पिढ्या पासून कातकरी जमातीतील एकूण ६० सदस्यांच्या सहा झोपड्या जमीनदार देवेंद्र देशप्रभू यांच्या जागेत मागच्या तीस वर्षापासून उभारून वास्तव्य करत आहेत. या ६० सदस्यांना गोवा मुक्त होवून ६० वर्षे आणि भारत स्वतंत्र होवून ७५ वर्षे होत असतानाच आजपर्यंत राजकर्त्यांनी आणि सरकारने कोणत्याच योजना, पाणी, वीज, रस्ता इतर सुविधा या कुटुंबियाना मिळत नाही.

नवचेतना युवक संघाचे माणुसकीचे दर्शन

पेडणे येथील युवकांची संघटना असलेल्या नवचेतना युवक संघाने या कातकरी जमातीतील कुटुंबियांच्या एकूण सहा झोपड्यांना सौर उर्जेच्या दिव्यांचा वाटप केलं. तसंच ९ मुला-मुलींना शिक्षण घेताना वर्षभरासाठी लागणारे सर्व शिक्षणाचे साहित्यही प्रदान करण्यात आलं. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून विराज हरमलकर यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. जी मुले शिक्षण घेतात त्यांना आठ दिवासातून एकदा त्यांच्या झोपडीत सर्वशिक्षा अभियानचे शिक्षक येवून एक दिवस शिकवतात. ही मुलं इंग्रजी आणि मराठी आकडे लिहिणे, वाचणे, असा अभ्यास करतात. ही मुलं मन लावून या झोपडीत शिक्षण घेत असल्याचे चित्र दिसत आहे. माणूसकीच्या नजरेतून जिथं राज्यकर्ते व सरकार पोचत नाही, ते काम युवक संघाने हाती घेवून आंतरराष्ट्रीय स्थरावरची कामगिरी या संघाने केल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.

सरकार राजकर्ते गायब

कोणत्याही पक्षाचे नेते असो राजकर्ते असो किंवा सरकार असो, आपल्याला किती मते मिळणार यांचा विचार करून मतांची गणिते करत असतात. या आदिवासी कुटुंबीयांकडे एकही मत नसल्याने त्याकडे राजकर्ते दुर्लक्ष करत आहेत. या कुटुंबियांना पेडणेचा आमदार कोण, मुख्यमंत्री कोण, सरकार कोण चालवतो याची काहीच माहिती नाही.

या कुटुंबियांची मतदान नोंदणी करून त्यांना मतदानाचा अधिकार अजूनही दिलेला नाही. मते नसल्याने राजकर्ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. माणूसकी हरवून सरकार आणि राजकर्ते सरकार चालवतात असे चित्र या झोपड्याकडे पाहिल्यावर दिसून येतं.

सरकार अस्तित्वात आहे कि नाही हे या झोपड्यांकडे लक्ष मारल्यावर दिसून येते. जंगलात वास्तव्य करून राहणारे हे कातकरी जमातीतील कुटुंबीय शहरात जी जी कामे दिवसाकाठी मिळतात ती करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. काही मुले शिकतात. तर काही मुले शिकत नाही. जी शिक्षण घेतात त्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी येथील जाणकार नागरिकांनी आपली प्रतिक्रिया देताना सर्वांचे आभार मानले.

आमच्या झोपड्यात विजेचे दिवे आम्ही कधी पाहिले नव्हते, झोपड्यात काल रात्री दिवे पेटले आणि लहान लहान मुले हि लवकर झोपायची ती मुले रात्री दहा पर्यंत जागीच होती. विजेच्या दिव्यांचे त्यांना आश्चर्य वाटत होते. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, आम्ही अज्ञानी आहोत. मात्र आमची मुले अनपड राहता कामा नये. आम्ही सोसले ते मुलांनी सोसू नये सरकारने काहीतर आमच्यासाठी करावे.

अशी हात जोडून आदिवासी नागरिकाने भावानावंश होऊन मागणी केली. नव चेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी म्हटलंय की,

सरकार पातळीवर विविध योजना राबवल्या जातात. विविध प्रकल्प आणले जातात. मात्र या घटकाकडे कुणी डोळे उघडून पाहत नाही. नवचैतन्य विचार घेवून समाजसेवक विराज हरमलकर यांच्या सहकार्यातून या कुटुंबियाना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीच्या वेळी मुले झोपडीत झोपत होती त्यावेळी अनेक सरपटणारे प्राणी, जनावरे या झोपड्यात येतात. मात्र अंधार असल्याने नक्की कुणाच्या हालचाली असतात ते कळणे कठीण होते .

यावेळी विराज हरमलकर, ओंकार गोवेकर, किशोर किनळेकर, सिंथिया गावकर आणि भगवान शेटकर आदींनी विचार मांडले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!