साट्रे सत्तरीत स्ट्रॉबेरीचं उत्पादन यशस्वी, युवा शेतकरी श्याम गांवकरांची किमया

सत्तरी तालुक्यात काजू, सुपारी, केळी, आंबा, नारळ या पीकांसोबत आता स्ट्रॉबेरीचीही पडणार भर!

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: सत्तरी हा उत्तर गोव्यातील शेवटचा ग्रामिण तालुका. या तालुक्याला निसर्गाची मोठी श्रीमंती लाभली आहे. शेती हा इथल्या लोकांचा पारंपारीक व्यवसाय. काजू, सुपारी, माड, केळी, आंबा अशी शेती उत्पादने येथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या उत्पादनांमध्ये आता स्ट्रॉबेरीचीही भर पडलीय. याला कारण ठरलंय सत्तरीतील युवा प्रगतशील शेतकरी श्याम गांवकर!

म्हादई अभयारण्यातील साट्रे गावात गेल्या काही वर्षांपासून श्याम गांवकर हा युवा होतकरू शेतकरी शेतीत नवनवीन यशस्वी प्रयोग करत आहे. आता तर त्याने आपल्या शेतात चक्क स्ट्रॉबेरीचं पीक घेण्यात यश मिळवलंय. श्याम गावकर यांनी सांगितल्याप्रमाणे,

स्ट्रॉबेरीची लागवड कशाप्रकारे केली जाते. हे दाखविण्यासाठी वाळपई विभागीय कृषी कार्यालयाने सत्तरीतील 25 शेतकऱ्यांना महाबळेश्वरला नेलं होतं. या कार्यशाळे मी सहभागी होतो. महाबळेश्वर येथील कार्यशाळा संपवून घरी येताना आपल्या सोबत हजारपेक्षा जास्त स्ट्रोबेरीची झाड आणली. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 3 हजार स्क्वे. मीटर जागेत स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड केली. झाडं लावल्यापासून आता दीड महिन्यांतच स्ट्रॉबेरीच पीक येण्यास सुरवात झाली आहे.

गोव्यातील हवामान स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी पूरक

गोव्यातील हवामान हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पुरक असल्याचं श्याम गांवकर यांनी म्हटलंय. मी साधारण हजारभर स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड केली होती. लागवड केलेली सर्व झाडं चांगल्या स्थितीत आहेत. आता हळूहळू स्ट्रॉबेरीचं पीक येण्यास सुरवात झाली असल्याची माहिती श्याम गांवकर यांनी दिली. सत्तरी तालुक्यात किंबहुना उत्तर गोव्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. माझ्यासमोर आता सत्तरी तालुक्यात स्ट्रोबेरीसाठी मार्केट तयार करण्याचं आव्हान आहे आणि मी ते मार्केट तयार करेन, असा विश्वास श्याम गांवकर यांनी व्यक्त केला.

यशस्वी उत्पादनामागे मोलाचं योगदान

आपण मोठ्या जिद्दीनं स्ट्रोबेरीचं उत्पादन घेतलं आहे. माझ्या या कष्टांना साथ लाभली ती वाळपई कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची, अशी कृतज्ञ भावना श्याम गांवकर यांनी व्यक्त केली. तसंच या कामात मला माझ्या कुटुंबीयांचीही मोठी साथ लाभल्याचं गांवकर म्हणाले. श्याम गांवकर हे मागील काही वर्षांपासून मिरची, काकडी आणि इतर उत्पादनांची यशस्वी शेती करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.