हजारो भाविक पेडणेच्या पुनवेला यंदा मुकणार

महाजनांपूरतीच होणार उत्सव साजरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मकबुल म्हाळगीमनी/ निवृत्ती शिरोडकर

पेडणे : करोना महामारीने लोकांची श्रद्धास्थानेही बंद पाडली आहेत. मानसिक तणाव दूर करण्यासाठी तसेच परिस्थितीशी झुंज देण्यासाठी ही श्रद्धास्थाने प्रेरणादायी ठरतात. पेडणेची पुनव हा त्यापैकीच एक मोठा उत्सव. इच्छापूर्ततेचे नवस फेडायचे. देवाचा कौलप्रसाद घेऊन मागचे पायदळी तुडवून नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचं धाडस देणारा हा उत्सव. यंदा करोनामुळे मर्यादीत स्वरूपात 31 ऑक्टोबरची पेडणेची पुनव साजरी होणार आहे. करोनाने घात केल्यामुळेच हजारो भाविक पेडणेच्या पुनव उत्सवाच्या रातीला मुकणार आहेत.

उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील हा सर्वांत मोठा उत्सव. आपल्या कुलदेवतचा कौल घेण्यासाठी तसेच पंचायतन देवतांच्या तरंगांचे दर्शन घेण्यासाठी गोव्यासह, शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झालेले हजारोंच्या संख्येने भाविक या उत्सवाला नित्यनेमाने हजेरी लावतात. या उत्सवाला हजेरी लावून पुन्हा एकदा नव्याने आपल्या आयुष्याला सुरूवात केली जाते. या एकाच उत्सवात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. यंदा मात्र करोनाने या उत्सवाचा बेरंग केला आहे. केवळ महाजनांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडून यंदाचा उत्सव साजरा केला जाईल,अशी माहिती देवस्थान समितीने दिली.

पेडणेचे जमिनदार आणि माजी आमदार जितेंद्र देशप्रभू हे पेडणेच्या श्री देवी भगवती देवस्थानचे अध्यक्ष होते. त्यांचा एक विशिष्ट दरारा या उत्सवावर होता. त्यांचे निधन झाल्यामुळे आता ही जबाबदारी समितीच्या उर्वरीत पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पडली आहे. पेडणेचे मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्याशी देवस्थान समितीची सखोल बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्ष विनोद सावळ यांनी ही माहिती दिली.

पेडणे महालातील सुप्रसिद्ध पुनव उत्सव यंदा 31 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. कोजागिरीच्या चांदण्यात हजारो भाविक पहाटेपर्यंत या पुनवेचा आस्वाद लुटतात. नवरात्रोत्सव ते कोजागिरी पौर्णिमापर्यत पेडणेत एक वेगळेच भक्तीमय वातावरण तयार होत असते. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही पुनव. सिंधुदुर्गर्ग , कर्नाटक , हुबळी , बेळगाव , कोल्हापूर, पुणे आदी भागातून हजारो भाविक या काळात श्रींचे दर्शन घेण्यासाठी पेडणेत दाखल होतात.

राजघराण्याचा उत्सव बनला लोकोत्सव

जाणकारांच्या मते हा उत्सव पूर्वी देशप्रभू राजघराण्यापूर्तीच मर्यादीत होता. दसरा हा उत्सव प्रामुख्याने राजघराणीच साजरा करायचे. पेडणे महाल हा यापूर्वी कुडाळ संस्थांनचा भाग होता. तदनंतर देशप्रभू घराण्याकडे हा वारसा आला. या राजघराण्यांच्या राजकीय , सामाजिक जीवनाची जाणीव करून देणारा उत्सव ठरला आहे.

पेडणेचा पुनव उत्सव घटस्थापनेपासून सुरु होतो. नऊ रात्री सात महाजानांना विभागून दिली जाते. उरलेल्या दोन रात्री देवस्थान समिती साजरी करते. या नवरात्रीची शेवटची नवमीची रात्र मोठ्या उत्साहात साजरी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घट उठवून रात्री नानेरवाडा येथील शाळेजवळ सिमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. पूर्वी येथे सोने लुटायला देशप्रभूंच्या दरबारातील स्वारी पालखीत यायची, अशी आठवण लोक सांगतात.

या महोत्सवाच्या अग्रपूजेचा मान देशप्रभू घराण्याला जातो. पूर्वी या सणात बळी देण्याची प्रथा होती. आता कोहळा कापून हा रिवाज पूर्ण केला जातो. ढोल ताश्यांच्या गजरात हर हर महादेव चा गजर एकून यापूर्वी पोर्तुगिजांनी या उत्सवावर बंदी आणली होती. तदनंतर त्यांना हा उत्सव सुरू करावा लागला. यापूर्वी देवस्थानच्या सेवेकऱ्यांना ठरावीक सेवा घालून दिल्या होत्या. कालांतराने या सर्व प्रथा बंद पडल्या आणि नव्या पिढीने त्या स्विकारल्या.

तरंगोत्सवाचा थरार

तरंगे म्हणजे आनंदाचे , वैभवाचे प्रतिक. पेडणेच्या पुनवेत तरंगे नाचवण्याचा थरारच वेगळा. पेडणेतील दासरोत्सवात दोन तरंगे नाचवली जातात. एक श्री भूतनाथ आणि दुसरे श्री रवळनाथ देवाचे. भूतनाथाची तरंगे एका विशिष्ठ प्रकारे नेसवली जातात. त्यावर झेंडुंच्या फुलांचा हार बांधला जातो. तरंगे नेसवताना वापरण्यात येणाऱ्या लुगड्यांना चिरा असे म्हणतात. ही लुगडी खास तारांगासाठी भाविकांनी अर्पण केलेली असतात. श्री रवळनाथाचे तरंग एकोणीस कापडांच्या घोसाचे असते. या कपड्यांच्या घड्या घालण्याचे काम ढोबी लोक पारंपारिक पद्धतीने करतात.

भूते काढण्याची प्रथा

या उत्सवात ढोल- ताशांचा आवाज घुमु लागला की अनेकांच्या अंगात जणू संचार येतो. भूतखेतांची बाधा झालेल्यांना खास या उत्सवात आणले जाते. ढोल ताश्यांच्या तालासुरात भूतनाथ ही भूते काढतो. भूते काढल्यानंतर देव भूतनाथचे तरंग डावीकडील डोंगराच्या दिशेने धावते. ह्याच काळात भक्तगण देवाला देऊळ बांधण्याचे आश्वासन देतात. त्याची कारवाई होत नसल्यामुळे देव नाराजी बनतात. बांध तू सायबा असे चकवा देणारे आश्वासन भक्तगण करून देवाला मनवतात आणि तेव्हाच भूतनाथाचे तरंग फिरून मागे येते पोर्तुगीज गव्हर्नरची नधरणी करून हा उत्सव सुरू करण्यात आला. त्यावेळपासून गव्हर्नरला उत्सवात मोठा मान होता. आता हा मान तालुका मामलेदारांना दिला जातो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!