मरणाने केली सुटका, स्मशानभूमीने छळले आहे..!

पणजीच्या स्मशानभूमीला वाली कोण? मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यविधीत अडसर.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ”मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…” या ओळी कोणाच्याही मृत्यूनंतर सहज सुचतात. पण पणजीतील स्मशानभूमीची दुरवस्था बघितली, तर ”मरणाने केली सुटका, स्मशानभूमीने छळले आहे…” अशाच प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

गोव्याच्या राजधानीचा समावेश स्मार्ट सीटी प्रकल्पात केला असला, तरी पणजीतील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर सांतिनेज-पणजी इथल्या हिंदू स्मशानभूमीला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. स्थानिकांत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते.

सांतिनेज स्मशानभूमी भरवस्तीत आणि रस्त्यालगत आहे. आजूबाजूला रहिवासी इमारती आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना निर्माण होणारा धूर ही या नागरिकांची प्रमुख समस्या. मृतदेहाचे दहन करताना येणार्‍या विशिष्ट वासामुळे नागरिक नेहमी त्रासलेले असतात. या समस्येवर तोडगा काढणं प्रशासनाला अद्याप शक्य झालेलं नाही. त्यात स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणार्‍यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

दिवे आहेत, पण वीज नाही
स्मशानभूमीत विजेच्या दिव्यांची सोय आहे. परंतु ते बंद आहेत. वीज कनेक्शनचा घोळ कायम असून सायंकाळनंतर स्मशानभूमीत अंधार असतो. या अंधारात मृतदेहांवर अंत्यसंस्कार कसे करावेत, असा प्रश्न नागरिकांना पडतो.

वाहनांच्या हेडलाइटचा आधार
अंधारात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाहनांच्या हेडलाइटचाच आधार असतो. विजेचे दिवे बंद असल्याने नागरिकांची बरीच कुचंबणा होते. स्मार्ट सीटी म्हणून निवड झालेल्या पणजीला हे शोभत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात.

हीच का ती स्मार्ट सीटी?
पणजीसारख्या सुंदर शहराचा समावेश स्मार्ट सीटी प्रकल्पात केला, त्यावेळी शहराच्या सौंदर्याला चार चाँद लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र शहरात अनेक समस्या दिसून येतात. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचा विकास करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन चालढकल करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!