मुरगावमध्ये मामलेदार कार्यलयाबाहेर गर्दी, कसा रोखणार कोरोना?

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुरगाव : कोविड महामारीचा धोका अद्याप संपला नसल्याने नागरिकांनी मुरगाव मामलेदार कार्यालयातून विविध दाखले मिळविण्यासाठी नाहक गर्दी करू नये असे आवाहन मुरगावचे मामलेदार साईश नाईक यांनी केले. संबंधित दाखल्यासाठी अर्ज दिल्यावर तो दाखला दोन दिवसांमध्ये देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केलंय. मुरगाव मामलेदार कार्यालयाबाहेर गर्दी होत
असल्याने सुरक्षा अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत असल्याने सदर गर्दी चर्चेत आली आहे. अशा प्रकारच्या गर्दीमुळे कोविडचा प्रसार होण्यास हातभार लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.
निवासी आणि उत्पन्न दाखले मिळविण्यासाठी मुरगाव मामलेदार कार्यालयासमोर गेल्या दोन आठवड्यापासून मोठी गर्दी दिसत आहे. सदर गर्दीमध्ये महिलांचा अधिक भरणा आहे. मुरगाव कार्यालयामध्ये खबरदारीची उपाययोजना म्हणून थेट प्रवेश देण्यात येत नाही.त्यामुळे दाखला मिळविण्यासाठी तसेच इतर कामांसाठी येणारे प्रवेशद्वाराबाहेर मोठी गर्दी करीत आहे. ते एकमेकांना खेटून रांगेत उभे राहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
वारंवार विनंती करूनही संबंधित सुरक्षा अंतर ठेवत नसल्याने, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका पोलिस शिपाईची नेमणूक प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. मात्र तरीही गर्दी आटोक्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
नागरिकांनी गर्दी टाळावी. दाखल्यांसाठी येणारयांना कर्मचारी वर्गाकडून योग्यरित्या दाखले देण्यात येतील.त्यासाठी कोणीही घाबरून जाऊ नये. गर्दी करून कोविड प्रसाराला हातभार लावू नये असे आवाहन मामलेदार नाईक यांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी करणे कार्यालयातील कर्मचारी वर्ग व इतर नागरिकांसाठी धोकादायक आहे. यापूर्वी मुरगाव मामलेदार कार्यालयातील काहीजणांना कोविडची लागण झाली होती.याची आठवण नाईक यांनी करून दिली.दाखल्यासाठी येणारयांनी
संयम बाळगावा. गर्दी केल्याने आपल्यासह इतरांनाही कोविडचा धोका निर्माण होईल याचे भान ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा –
तीन महिन्यात पहिल्यांदाच 50 हजारपेक्षा कमी रुग्ण! रुग्णसंख्या घटल्यानं मोठा दिलासा
खासगी जमिनीतील वाट अडवली; गुळेलीत संताप
मोठा दिलासा! ‘या’ महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार