दोडामार्गवासीयांचा आदर्श, उभारली ‘माणुसकीची भिंत’

आपण काही वस्तू कमी काळासाठी किंवा एखाद-दुसर्‍या वेळी वापरून ठेवून देतो. या वस्तू कोणी तरी गरीब वापरात आणू शकतो, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

दोडामार्ग : गोव्याच्या डिचोली तालुक्याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग इथं ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या हातून एखाद्या गोरगरिबाला मदत व्हावी, अशी इच्छा असणार्‍यांसाठी ही माणुसकीची भिंत उपयोगी ठरणार आहे. दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या मित्र मंडळाच्या वतीनं हा उपक्रम सुरू करण्यात आला.

या उपक्रमासाठी दोडामार्ग येथील पिंपळेश्वर सभागृहात एक दालन उघडण्यात आले आहे. या दालनात कपडे, घरातील वापराच्या वस्तू व अन्य सामग्री ठेवण्याची व्यवस्था केली आहे. आपण काही वस्तू कमी काळासाठी किंवा एखाद-दुसर्‍या वेळी वापरून ठेवून देतो. या वस्तू कोणी तरी गरीब वापरात आणू शकतो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आपल्या घरातील चांगल्या तसेच विनावापर असलेल्या वस्तू, कपडे वगैरे या दालनात आणून ठेवावेत. जेणेकरून गरजवंताला ती वस्तू नेता येईल, अशी या मागची संकल्पना आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, माजी सरपंच पांडुरंग बोर्डेकर, केशव रेडकर, प्रकाश काळबेकर, नितीन मणेरीकर, समीर घाडी, संदेश गवस, आनंद ताटे, सागर चांदेलकर, रजत राणे, बाळा कोरगावकर, दादा बोर्डेकर, गोपाळ गावडे, भिकाजी गावडे, नारायण दळवी, रामदास बागकर, श्रीधर रेडकर, श्याम मणेरीकर, बाबू खरवत, भिकू शिरोडकर तसेच भेेडशी येथील सिद्धेश उर्फ भैय्या पांगम आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!