सकाळी सव्वा सात वाजता घरं सोडल्यानंतर जे पाहिलं, तसं याआधी कधीच पाहिलं नव्हतं!

प्रतिनिधी विनायक सामंत यांचा पूरस्थितीचं रिपोर्टिंग करताना थरारक अनुभव

Goan Varta Live | प्रतिनिधी

23 जुलै, 2021! हा दिवस कधीच न विसरता येण्यासारखा. वेळ होती सकाळी 7 वाजून 15 मिनिटांची..

रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसाने सकाळी थोडी उसंत घेतली होती. नेहमीप्रमाणे मी पेपर घेण्यासाठी बाजारात गेलो होतो. तिथे काही जणांनी बोलताना मला असं लक्षात आलं की साखळी बाजारपेठेत वाळवंटी नदीचे पाणी घुसलंय. मी तडक घर गाठलं. क्षणाचाही विलंब न करता, साखळी बाजारपेठेकडे धाव घेतली. तिथे बांधलेल्या नवीन पुलावर पोहोचताच लोकांची खूप गर्दी दिसली. काय आहे म्हणून पाहण्यासाठी मी थांबलो असता, वाळवंटी नदीने घेतलेले रौद्र रूप माझ्या समोर आले. ते पाहताच मनात एक क्षण धडकीचं भरली. कारण, वाळवंटी नदीचे हे रौद्र रूप मी पहिल्यांदाच पहात होतो.

मी लागलीच साखळी बाजारपेठेतील पाण्याचा विसर्ग जिथून होतो, तिथल्या पंपिंग स्टेशनच्या दिशेने निघालो. तिथून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. हे सगळे पाहण्यासाठी स्थानिक लोकांनी गर्दी केली होती. तिथेच मला साखळी नगर पालिकेचे नगराध्यक्ष श्री राया पार्सेकर भेटले, जे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांचाशी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी पुढे निघालो.

सुपाची कुड इथं पुरानं कहर केला होता. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना स्थलांतरित केलं जात होतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही तिथे पोहोचले होते. मुख्यमंत्री आल्याचं कळताच, आणखी वेगानं तिथे जायला निघालो. पण नेहमीचा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला होता. म्हणून आडमार्गाने कसाबसा तिथपर्यंत पोहोचलो. गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. अखेर चालतच जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण रस्ता चिखलाने माखलेला. तो रस्ता तुडवत बचावकार्य जिथं सुरू होते तिथे पोचलो. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की…

अजून आपण पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही, त्यामुळे आत्ताच काही बोलू शकत नाही. तू माझ्यासोबत ये. आपण एकत्र परिस्थितीचा आढावा घेऊ.

असं म्हणून त्यांनी मला आपल्यासोबत घेतलं. मुख्यमंत्री आणि मी एकाच गाडीतून पूरस्थितीचा आढावा घेत पुढे निघालो. एकामागोमाग एक गावं आम्ही पाहत होतो. आजूबाजुला दिसणारं चित्र विदारक होतं. गोव्याचं असं रुप याआधी कधीच पाहिलं नव्हतं. शहारून जायला झालं. विठ्ठलापूर, दत्तवाडी, कारापूर, हरवळे अशा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पुराचे पाणी शिरलयं, तिथे जाऊन पहाणी केली. लोकांचं झालेलं नुकसान, त्यांची हतबलता अस्वस्थ करणारी होती.

हरवळेतील प्रसिद्ध रूद्रेश्वर मंदिराशेजारी असलेला नयनरम्य धबधबा बघायला पर्यटकांची बरीच गर्दी असते. पण शुक्रवारी या धबधब्यानं धारण केलेले रौद्ररूप मनात धडकी भरणारं होतं. लोकांची घरं, बागायती यांचे झालेले नुकसान पाहून बेचैन व्हायला झालं. काही जागी तर बाईक्स, कार, शेतात असलेली उपकरणे, पुराच्या पाण्यात वाहून जात होती. डोळ्यांदेखत सगळं वाहून जात होतं. पण जीव वाचवायचा की सामान, अशी अवस्था लोकांची झालेली पाहावत नव्हतं. सगळ्याचीच नासाडी झालेली.

प्रचंड मेहनतीने उभं केलेलं पिक रातोरात डोळ्यांदेखत मातीत मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. डोळ्यांदेखत जे जे दिसत होतं, त्यावर विश्वासच बसत नव्हता. पुराच्या पाण्याचे क्षणात होत्याचं नव्हतं केलं होतं. हे सगळं आटोपतं घेत असतानाच डिचोली येथील साळ गावात पाणी घरात गेल्याचे कळालं. घाईघाईने कसाबसा साळ गाव गाठला. तिथे असलेल्या श्री भूमिका देवळात पाणी शिरलं होतं. देवळाच्या आजूबाजूची घरं अर्धी पाण्याखाली गेलेली. लोकं हाताला मिळेल ते जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धडपडत होते. इच्छा नसतानाही घर सोडून सुरक्षित जाणं लोकांनाही भाग होतं.

मध्यरात्री अचानक तिळारी धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं. साळ येथील असलेल्या बंधाऱ्यावरून पाण्याचा प्रवाह वाढला होता. हे दृश्य थरकाप उडवणारं होतं. शब्दात या दृश्यांची मांडणीच होऊ शकत नाही. प्रवाह इतका प्रचंड होता की लोखंडी कठडा देखील तुटून गेला. पुराच्या पाण्याबरोबर आलेले लाकडाचे मोठे ओंडके, झाडांचे खोड बंधाऱ्यात अडकून पडले होते.

गावातील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण पुराच्या तडाख्याने लोक एवढे बिथरले होते, घाबरले होते… की कुणीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. परिस्थितीच बेताची होती. लोकांच्या डोळ्यांसमोर त्यांचे संसार वाहून जात होते. आदल्या दिवशी रात्री झोपताना कुणी कल्पनाही केली नसेल, की दुसरा दिवस आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरेल! पुराच्या दृश्यांनी तहान भूक सगळंच मेलं होतं. सकाळी ७.३० वाजता सुरू केलेला प्रवास संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरुच होता. दुपारच्या जेवणाचं सोडा पण ज्यांची घरं गेली, डोक्यावरच छप्पर हिरवलंय, अशांच्या जेवणाचं काय, राहण्याचं काय, या विचारांनी आणखीनच गलबलून जायला होत होतं.

दिवसाच्या शेवटी मनात विचार आला की का बरं निसर्गराजा रागावला असेल? मध्यरात्री आलेल्या या प्रलयाला कोण बरं जबाबदार असेल? सरकार आणि प्रशासनाला दोष देऊन झालेलं नुकसान भरून येणार का? लोकांची घर, बागायती, संसार सगळं उध्वस्त झाले! याला माणूसच जबाबदार नाही का?

सरकार नुकसानभरपाई देणारच… पण किती?? त्या नुकसानभरपाई ने शेतीसाठी, बागायती साठी घेतलेली मेहनत, केलेले रात्रंदिवस कष्ट, ह्या सगळ्यांची भरपाई खरचं होईल का? संपुर्ण उध्वस्त झालेल्या संसाराची घडी बसयला हि नुकसानभरपाई पुरेशी आहे का? नक्की सरकार कशाकशाची भरपाई देईल आणि कुणाला?

अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या भाऊगर्दीत पाऊस कधी थांबला होता, याची जाणीवच झाली नाही. पाऊस थांबला होता. पण लोकांच्या डोळ्यांत जे आभाळ भरुन आलंय, त्यानं अश्रूंचा महापूर येईल! जगणं आणखी कठीण होईल. पुढे या सर्व कुटुंबापुढे काय वाढून ठेवलेलं असणार आहे, याच्या विचारातच थकून गेलो. डोळा कधी लागला, कळलंच नाही!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!