आयआयटीवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या ऑफरवर मेळावलीवासीय म्हणतात…

आयआयटीच्या विषयावर मी कुठेही येऊन चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे. मात्र पाचशे लोकांसोबत चर्चा होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : आयआयटीच्या विषयावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पुन्हा एकदा चर्चेसाठी एक पाऊल पुढे केले होते. मात्र शेळ मेळावलीवासीयांनी मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

आयआयटीच्या विषयावर कुठेही येऊन चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र त्यासाठी आधी गावकर्‍यांनी चर्चेसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करावी. 500 लोकांबरोबर चर्चा होऊ शकत नाही, ती सभा होते, असे सावंत म्हणाले होते.

चार जणांची समिती करण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्र्यानी सर्वांसमोर चर्चेसाठी यावे. लोक आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शेळ मेळावलीत आयआयटी प्रकल्प नकोच असल्याचे मेळावली बचाव अभियानाचे निमंत्रक शशिकांत सावर्डेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पासाठी सीमांकन करण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांना मंगळवारी आंदोलकांनी विरोध केला होता. सुमारे सहा तास काम थांबवून ठेवण्यात आलं होतं. अखेर अधिकारी माघारी परतल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मागण्या मान्य होईपर्यंत सीमांकनाचं काम करु न देण्याची आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. याच वेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चाही केली. मात्र ती अयशस्वी ठरली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!