वाचा, कोणी दिला गोवा सरकारला हिंसक आंदोलनाचा इशारा…

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपई : गुळेली येथील प्रस्तावित आयआयटी (IIT) प्रकल्पविरोधी आंदोलनाची धग कायम आहे. प्रकल्पाला विरोध करणार्या काही आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या. त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलक वाळपई पोलिस स्थानकासमोर जमा झाले. सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर अधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. भविष्यात नोटीस मिळाल्यास अहिंसक पद्धतीने सुरू असलेले आंदोलन हिंसक होईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यानंतर होणार्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनातील सहभागी काँग्रेसचे दशरथ मांद्रेकर व सामाजिक कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांना अटक झाल्यानंतर गुरुवारी वाळपई पोलिस स्थानकावर मोर्चा नेला होता. त्यांच्या सुटकेनंतर आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, पोलिसांनी आठ आंदोलकांना नोटिसा बजावल्या आहेत. गुळेली पंचायतीवर 3 सप्टेंबर रोजी नेलेल्या मोर्चाच्या वेळी त्यांनी गोंधळ घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या नोटिसा संबंधित कार्यकर्त्यांना गुरुवारी मिळाल्या. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी पुन्हा वाळपई पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्यात आला.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. या मोर्चात सुमारे दोनशे आंदोलक सहभागी झाले होते. नोटिसा बजावल्याबदल तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. काही आंदोलक त्या आंदोलनात सहभागी नसतानाही त्यांना नोटिसा पाठवल्यामुळे सरकार आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. भूमापन पथकाला विरोध केल्याबद्दल काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतची तक्रार दिलेल्या व्यक्तीला हजर करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
शशिकांत सावर्डेकर व इतरांनी उपनिरीक्षक राघोबा कामत यांच्याकडे निवेदन सादर केले. शांततेत सुरू असलेले हे आंदोलन आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्यास हिंसक आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. सुमारे अडीचशे जणांच्या सह्या या निवेदनावर आहेत.
धक्काबुक्की करणार्यांना नोटीस बजावणारच
गुळेली पंचायतीवर 3सप्टेंबर रोजी मोर्चा नेला होता. यावेळी गोंधळ करून सरपंच अपूर्वा च्यारी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला होता. अशी कृती करणार्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. बेकायदेशीर कृत्य करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, असे उपनिरीक्षक राघोबा कामत यांनी आंदोलकांशी झालेल्या चर्चेवेळी स्पष्ट केले.
आवाज दडपण्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देऊ : सावर्डेकर
शशिकांत सावर्डेकर म्हणाले, आतापर्यंत आंदोलकांवर विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. तरीदेखील आंदोलन शांततेने सुरू होते. मात्र सरकारला आंदोलक हिंसक व्हावेत असे वाटत असेल तर त्यासाठी आमची तयारी आहे. आयआयटी हद्दपार केल्याशिवाय या आंदोलनाला पूर्णविराम दिला जाणार नाही. सरकारने आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे.