एक मदतीचा हात, अन् दोडामार्गमधील शववाहिकेची समस्या निकालात!

विवेक नाईक यांच्या संकल्पनेतून नि:शुल्क सेवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग : दोडामार्गमधील उद्योजक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक नाईक (Vivek Naik) यांच्या संकल्पनेतून दोडामार्गच्या जनतेसाठी पहिल्या शववाहिकेचे लवकरच लोकार्पण होणार आहे. दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना विनाशुल्क सेवा मिळणार आहे.

विवेक नाईक यांच्या सुशीलाबाई मेमोरिअल ट्रस्टतर्फे शववाहिनीवरील सर्व खर्च होणार आहे. तालुक्यात आकस्मिक, अपघाती व अन्य करणाने मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे. दोडामार्ग शहर व तालुकावासीयांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्याचे भाग्य आपल्याला लाभले हे मोठे समाधान असल्याचे विवेकानंद नाईक यांनी सांगितले. भविष्यात अजूनही या तालुक्यातील व शहरातील जनतेच्या उत्कर्षासाठी राबवणार असून विविध लोकोपयोगी उपक्रम करणार असल्याचे ते म्हणाले.

ट्रस्ट बनणार सर्वसामान्याचे आधार केंद्र

दोडामार्ग शहरात सुशीलाबाई मेमोरिअल ट्रस्ट सर्वसामान्याचे आधार केंद्र बनणार आहे. ट्रस्टतर्फे शासकीय कामांच्या निपटार्‍यासाठी मदत केंद्र उभारण्याचाही विवेक नाईक यांनी मनोदय व्यक्त केला. नाईक यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भविष्यातील सामाजिक कार्याची दिशा स्पष्ट केली.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर

कसई दोडामार्गचे माजी सरपंच राजेश प्रसादी, मनोज पार्सेकर यांच्यासह युवा ब्रिगेडला शहर व तालुक्याच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नाईक यांनी दिली. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विवेक नाईक यांच्या या उपक्रमाचेही तालुक्यातील जनतेतून स्वागत होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!