नेसाय, चांदोरनंतर दवर्लीत आंदोलन पेटण्याची चिन्हे

रेल्वे दुपदरीकरणाविरोधात नागरिक आक्रमक

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : रेल्वे दुपदरीकरणाविरोधात आक्रमक झालेले नागरिक दवर्लीतही आंदोलन करण्यास सज्ज झालेत. येत्या 9 नोव्हेंबरपूर्वी डबल ट्रॅकिंगचं काम बंद झालं नाही, तर हजारो नागरिक दवर्लीत आंदोलन करतील, असा इशारा ‘गोयांन कोळसों नाकां’तर्फे देण्यात आलाय.

रेल्वे दुपदरीकरणाविरोधात दक्षिण गोव्यात सुरू झालेलं आंदोलन आणखी भडकण्याची चिन्ह दिसतायत. आधी नेसाय आणि नंतर चांदोर इथं लोकांचा जमाव मध्यरात्री आंदोलनासाठी रेल्वे रूळांवर उतरला. आता रेल्वे प्रशासनानं 9 नोव्हेंबरला दवर्लीच्या रेल्वे क्रॉसिंगवर दुपदरीकरणाचा घाट घातलाय. या विरोधात गोयांन कोळसो नाकाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. चांदोरमध्ये तर स्थानिकांनी ढोलताशे बडवून धरणे धरली. महिलांनी उत्स्फूर्तपणे फुगड्या घातल्या.

…तर आंदोलन दुप्पट ताकदीनं

गोयांत कोळसो नाकां आंदोलनाचे सहनिमंत्रक अभिजीत प्रभुदेसाई म्हणाले, 9 नोव्हेंबरला प्रस्तावित असलेल्या दवर्ली इथलं दुपदरीकरण रद्द केल्याचं सरकारनं जाहीर न केल्यास आंदोलन दुप्पट ताकदीनं करण्यात येईल. लोकांचा उद्रेक लक्षात घेउन संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर दुपदरीकरण रद्द करावं, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी राजकीय पक्षांचा पाठिंबा

हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि साहजिकच विरोधी पक्षांची पावलंही तिकडे वळली. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. पण लोकांनी मात्र कुठल्याही पक्षाला आंदोलनाचं नेतृत्व करू देणार नसल्याचा चंगच बांधलाय. या कृतीतून हे जनआंदोलन असल्याचा संदेश लोकांनी सर्वच राजकीय पक्षांना दिलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!