रेल्वे दुपदरीकरणाचा घाट कोळसा वाहतुकीसाठीच!

दुपदरीकरण झाल्यास रेल्वे मार्गाजवळ असलेल्या गोमंतकीयांच्या घरांचं मोठं नुकसान होणार आहे. दुपदरीकरणानंतर गोव्यातून दररोज शंभर रेल्वेंची वाहतूक होईल. त्यामुळं कंप होऊन आजूबाजूच्या घरांना तडे जातील.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचा घाट केवळ कोळसा वाहतुकीसाठीच घातला जात आहे. पण रेल्वे मार्गांचं दुपदरीकरण गोव्यासाठी घातक ठरेल, असा दावा करत, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा (Alina Saldhana) यांनी भाजप सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची गुरुवारी पणजीत भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गोव्यातून कर्नाटकात कोळसा वाहतूक करण्यासाठीच रेल्वे मार्गांचं दुपदरीकरण करण्यात येत आहे. पण तसं झाल्यास रेल्वे मार्गाजवळ असलेल्या गोमंतकीयांच्या घरांचं मोठं नुकसान होणार आहे. दुपदरीकरणानंतर गोव्यातून दररोज शंभर रेल्वेंची वाहतूक होईल. त्यामुळं कंप होऊन आजूबाजूच्या घरांना तडे जातील. कोळसा वाहतुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढून त्याचा फटका गोमंतकीयांच्या आरोग्याला बसेल. पर्यावरणावर दुष्परिणाम होतील. याचा विचार करूनच या प्रकल्पाला मोलेवासीयांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळं राज्य सरकारने या रेल्वे मार्गाचा सर्वच अंगांनी विचार करावा. लोकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात व त्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्यमंर्त्यांनी सकारात्मकता दर्शवली असून, ते निश्चित योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षाही साल्ढाणा यांनी व्यक्त केली.

आम्हालाही कोळसा नको, पण..!
भाजप सरकारलाही कोळसा नको आहे. पण गेल्या 14-15 वर्षांपासून राज्यातून कोळसा वाहतूक होत आहे. ती आम्ही थांबवू शकत नाही, असं म्हणत पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. गोव्यातून दररोज 50 मिलियन टन कोळशाची वाहतूक होते, असा अपप्रचार विरोधक पसवत आहेत. पण 50 मिलियन टनासाठी 300 रेल्वे लागतात. आणि तितक्या रेल्वेंची वाहतूक दररोज होत नाही, हे जनतेने लक्षात घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!