‘स्वयंपूर्ण गोवा’च्या दिशेने वाटचाल

सचिव, खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रशिक्षण

Goan Varta Live | प्रतिनिधी

प्रकाश नाईक,

(माहिती अधिकारी, माहिती व प्रसिद्धी खाते, गोवा सरकार)

आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत गोव्याला सर्व क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण बनविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने यंत्रणा सज्ज केली आहे. सरकारचे सचिव, खाते प्रमुख आणि सरकारी खात्यांमधील इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रशिक्षण देऊन, या दिशेने दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. हा तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम गेल्या महिन्यात नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आला होता.

व्हिजन डॉक्युमेंटवर भर

स्वयंपूर्ण गोवा, सक्षम विकास ध्येये, आत्मनिर्भर भारत, वित्त व्यवस्थापन, हिशेब यंत्रणा, केंद्र पुरस्कृत योजना आणि खात्यांचे व्हिजन डॉक्युमेंट्स या संबंधित विषयांवर सहभागी झालेल्यांमध्ये जागृती करण्यात आली. रिसोर्स व्यक्तींनी सहभागींना मार्गदर्शन करण्याबरोबरच, मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सामुहिक प्रयत्न, योग्य आंतर-खातीय समन्वय, आवेश व जोमासहित काम करणे, ध्येय निश्चित करणे, ज्यात लघुकालीन व दीर्घकालीन ध्येयांचा समावेश असेल, आणि त्यानुसार नियोजन करून तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे, जेणेकरून त्यांची जीवनशैली सुधारू शकेल, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांना सक्रिय होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहित केले आणि आपल्या संबंधित खात्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते की नाही याची खात्री करावी, जेणेकरून स्वयंपूर्णता व सक्षम विकास साधला जाईल, असे सांगितले.

१९१ सरकारी अधिकारी ‘स्वयंपूर्ण मित्र’

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर, देशातील छोटे राज्य असलेल्या गोव्याने त्वरित प्रयत्न केले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण देशाच्या बरोबरीने गोवा त्यात सहभागी झाला. गोव्यात, स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत, राज्य सरकारने अधिकाधिक ग्रामपंचायतींसाठी १९१ सरकारी अधिकार्‍यांना स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्त केले आहे आणि तालुका स्तरावर १२ नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. या स्वयंपूर्ण मित्रांनी अगोदरच कोविड-१९ जागतिक महामारीच्या काळात ग्रामपंचायतींना भेट देऊन सरपंच, पंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सचिव यांच्याशी समन्वय साधला आहे. याद्वारे केंद्र सरकारद्वारे पुरस्कृत केल्या गेलेल्या आणि राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व पात्र नागरिकांना मिळतो आहे याची सुनिश्चिती ते करत आहेत व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची खात्री करत आहेत. हे अधिकारी आपल्या अधिकारक्षेत्रात येणार्‍या भूमिकांच्या व जबाबदार्‍यांच्या अनुषंगाने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्या अखत्यारित येणार्‍या प्रभागांचा व क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून समन्वय

आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने राज्यात बैठका घेतल्या जातात, ज्यात मुख्यमंत्री प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नियुक्त केलेल्या स्वयंपूर्ण मित्रासोबत समन्वय साधून कामाची देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या स्वयंपूर्ण परीक्षक यांना मार्गदर्शन करतात.

प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न

एक आदर्श राज्य म्हणून गोव्याची प्रतिमा तयार करणे हा सरकारचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने अलीकडेच सरकारने व्हिजन २०२०-२०२५ हे ब्रीद घेऊन एका मिशनचा प्रारंभ केला आहे, ज्याद्वारे सरकारी प्रशासन सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि ते जनतेच्या गरजांना अधिकाधिक प्रतिसादात्मक होऊन जनतेला अधिक चांगले, परिणामकारक व पारदर्शी प्रशासन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारी अधिकार्‍यांनी आपल्या संबंधित खात्याची कृती योजना तयार करावी आणि पुढील पाच वर्षांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, हा या योजनेचा हेतू आहे.

स्वयंपूर्ण मित्र नियुक्त करण्याची सरकारची कल्पना म्हणजे एक निर्णायक पाऊल आहे. आता स्वयंपूर्ण मित्राच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असून, स्वयंपूर्ण गोव्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अविरत, समर्पित व दृढ प्रयत्न त्यांना करावे लागतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!