ACCIDENT | अज्ञात वाहनाने ठोकरल्याने युवकाचा मृत्यू

सोमवारी रात्रीची घटना; ‘हिट अँड रन’ अंतर्गत गुन्हा नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः म्हावळींगे डिचोली येथे सरकारी प्राथमिक शाळेजवळ रस्त्यावर सोमवारी रात्री एका अज्ञात वाहनाने ठोकारल्याने घाडीवाडा म्हावळींगे येथील दिलीप हरिश्चंद्र गावकर (वय ३०) हा युवक जागीच ठार झाला. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी ‘हिट अँड रन’ गुन्हा नोंदविला असून पोलीस सदर अज्ञात वाहनाचा आणि वाहनचालकाचा शोध घेत आहेत. 

डोक्याला मार लागल्याने मृत्यू

सदर घटना सोमवारी ७ जून रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास घडली. रस्त्यातून घाडीवाडा म्हावळींगे येथील आपल्या घरी येत असताना सरकारी प्राथमिक शाळेजवळ ‘बोरीचे मरड’ या ठिकाणी दिलीप गावकर याला अज्ञात वाहनाने ठोकारले. या जबरदस्त धडकेत त्याच्या डोक्याला जबर मार बसला. अपघातापूर्वी दिलीप याला रस्त्यातून येत असताना गावातील दोन तीन जणांनी पाहिलं होतं. तर १०.३० वा. दिलीप रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसून आला. 

हेही वाचाः वास्कोत डेंग्यूमुळे नागरिकांत भीतीचं वातावरण

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बांबोळीत

याची माहिती मिळताच गावतील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना आणि १०८ रूग्णवाहिकेला देण्यात आली. नंतर त्याचा मृतदेह बांबोळी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आणि उत्तरीय तपासणीअंती तो काल मंगळवारी कुटूंबियांच्या स्वाधीन देण्यात आला. 

‘हिट अँड रन’ अंतर्गत गुन्हा नोंद

याप्रकरणी डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाळणी अधिक तपास करीत आहेत. सदर प्रकरण हिट अँड रन म्हणून नोंदविण्यात आले असून पोलिसांनी सदर अज्ञात वाहनाचा आणि वाहनचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!