युवक काँग्रेस धावले कोविड रुग्णांच्या मदतीला

कोविड रूग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी, ऑक्सिजन सिलिंडर नेण्यासाठी सुरु केली वाहने

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा प्रदेश युवक काँग्रेसने कोविड रूग्णांच्या मदतीसाठी आपल्या सेवांचा विस्तार करत शुक्रवारी कोविड रूग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी तसंच ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक करण्यासाठी दोन वाहनं सुरू केली आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसीचे  अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेस नेते जोएल आंद्रादे आदी उपस्थित होते. पणजी येथील काँग्रेस हाऊसजवळ या सेवेची सुरुवात केली.

हेही वाचाः संगीतकार वनराज भाटिया कालवश

लोकांचे प्राण वाचविणं हे प्राधान्य

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी युवक काँग्रेसच्या कार्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, कठीण काळात लोकांची मदत करणं हे कौतुकास्पद. गोवा कोविड संकटात सापडला आहे, परंतु भाजप सरकारने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अनेक ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात भेट देण्यासाठी मदतीची अपेक्षा करीत आहेत. कारण त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. यासाठी युवक कॉंग्रेस आशेचे किरण बनली आहे. कोविड परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविणं हे प्राधान्य असलं पाहिजे.

हेही वाचाः BIG BREAKING : लॉकडाऊन नव्हे, राज्यव्यापी कर्फ्यू!

मानवतेचं उदाहरण

चोडणकरांनीही युवक काँग्रेसने उचलेल्या या पावलाचं कौतुक केलं. युवक काँग्रेसने लोकांना ऑक्सिजन देऊन मानवतेचं उदाहरण ठेवलं आहे. युवक काँग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या अनेक समर्थकांनाही मदत केली आहे. आमचं ध्येय लोकांचे प्राण वाचविणे आहे. कोविडची साखळी तोडण्यासाठी लोकांनीही युवक काँग्रेसला मदत करण्याचं आवाहन चोडणकर यांनी केलं आहे.

हेही वाचाः शिल्पा शेट्टीच्या घरात कोरोनाचा विस्फोट

भाजपकडून आम्हाला त्रास

रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आवश्यक व्यवस्था करण्यास सरकार अपयशी ठरल्याने युवक काँग्रेसने गेल्या पंधरा दिवसांत अनेक रूग्णांना रूग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांना जीवदान दिलं आहे. ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात भाजपा सरकारला अपयश आलं आहे आणि याचा पर्दाफाश डॉक्टरांनीच केला आहे. ऑक्सिजन नसल्याल्यामुळे डॉक्टर असहाय्य बनले आहेत. जेव्हा आम्ही रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे सिलिंडर आम्ही कुठे खरेदी केले याची चौकशी करण्यासाठी भाजप सरकारने आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये बोलवून त्रास दिला. काँग्रेस लोकांसाठी आणि कोविड रुग्णांसाठी काम करत असल्याची या सरकारला ॲलर्जी असेल तर त्यांनी स्वतः लोकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि जर भाजपा कामगिरी करू शकत नसेल तर त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. त्यांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही, असं अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर म्हणाले.

हेही वाचाः गोवा विमानतळावरून अत्यावश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक अखंडितपणे सुरू

दक्षिण गोव्यातही विस्तार करणार

ऑक्सिजन सिलिंडर्स सुरक्षित आणि पद्धतशीरपणे वाहतूक करता यावं या उद्देशाने हे वाहन सुरू केलं गेलं आहे. लोक आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात, आम्ही लवकरात लवकर त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करू. त्यांचे प्राण वाचविणं हे आमचं ध्येय आहे,  असा  विश्वास अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांनी व्यक्त केला. याशिवाय युवा काँग्रेसने गरीब आणि गरजू रूग्णांना, तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही,  उपचारासाठी रूग्णालयात नेण्यासाठी वाहन सुरू केलं आहे. अनेक लोकांनी आम्हाला कॉल करुन सांगितलं की एम्बुलन्स उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे आम्ही वाहनांची व्यवस्था केली. परंतु नंतर आम्हाला वाटलं की या कारणासाठी खास वाहन असायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ही सेवा सुरू केली आहे. सध्या हे वाहन उत्तर गोव्यासाठी उपलब्ध होईल आणि नंतर आम्ही दक्षिण गोव्यात त्याचा विस्तार करू. अशी अनेक कुटुंबं आहेत की ज्यांच्याकडे वाहनं नसतात आणि म्हणूनच त्यांना रुग्णालयात पोहोचणं अवघड जात. आम्ही प्रत्येक उपयोगानंतर वाहन सॅनिटायझ करणार आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!