युवक कॉंग्रेसतर्फे किराणा सामान, खाद्यपदार्थ पाकिटे, मास्क व सॅनिटायझरचे वाटप

गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचं केलं कौतुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसच्या सुमारे ५०० सदस्यांनी शनिवारी लोकांना किराणा सामान, खाद्यपदार्थांचे पाकिटे, सॅनिटायटीझर्स आणि मास्कचे वाटप केले. एआयसीसी सचिव व गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव मडगांव आणि ओल्ड गोवा येथील वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमांत उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम गोव्यातील सर्व गटांनी राबविला. सांत आंद्रे गटाने जीएमसीमधील रूग्णांच्या नातेवाईकांना अन्नाची पाकिटे वाटली, तर ओल्ड गोवा येथील वृद्धाश्रमात कुंभारजुवा गटातर्फे किराणा सामान देण्यात आले.

दिनेश गुंडू राव यांनी गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसच्या ह्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी संपर्कात राहण्याचे आवाहन केले. “ही मानवतेची मोठी सेवा आहे. आम्हाला या कठीण वेळी लोकांना मदत करण्याची आणि त्यांच्याशी चांगला संबंध जोडण्याची गरज आहे. ” असे राव म्हणाले.

युवा कॉंग्रेसच्या कार्याचे कौतुक करताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, तरुणांनी लोकांना मदत करून एक आदर्श ठेवला आहे. “या साथीच्या रोगामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. आम्हाला त्यांना मदत करण्याची गरज आहे. ” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, गोव्यातील लोकांनी युवा कॉंग्रेसच्या कार्याचे कौतुक केले आहे, ज्यांनी यापूर्वी कोविड रूग्णांना ऑक्सिजन पुरवून आधार दिला.

आजच्या कार्यक्रमात सुमारे 500 सभासद सहभागी असल्याची माहिती वरद म्हार्दोळकर यांनी दिली. “किराणा सामान आणि इतर वस्तूंचे वितरण करण्यासाठी आमचे सर्व 40 गटांचे सभासद आज काम करत होते. दिनेश गुंडू राव यांनी आमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. ” असे ते म्हणाले.

“मागील दोन ते तीन महिन्यांपासून आम्ही कोव्हिडमुळे लोकांना जो त्रास झाला आहे, ते बघितले आहे. लॉकडाऊन दरम्यान कोणतेही काम नसल्याने, असंघटित क्षेत्रालाही अडचणींचा सामना करावा लागला. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना किराणा सामान पुरविले. कोविडची परिस्थिती सामान्य होईपर्यंत आम्ही लोकांना मदत करू. ” असे अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!