हळर्ण गावात युवकच बनले जनतेचे तारणहार !

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांच्या आश्वासनांकडं आता जनतेचं लक्ष !

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

पेडणे : गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडल्याने सगळीकडे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. सगळीकडे अत्यंत बाका प्रसंग आला होता. अनेकांची घरे पुरात वाहून गेली होती. अनेक लोक पुरातच अडकले होते. ही परिस्थिती गोव्यातील पेडणे तालुक्यातील हळर्ण गावातही होती. अशा वेळी “माणसांनी माणसाशी माणसासम वागणे” या ओळीचा खरा अर्थ हळर्ण गावातील युवकांनी घडवून आणला.

या गावात पुरस्थिती एवढी बिकटं होती की जरासा विलंब अनेकांचा जीव गमावण्यास कारणीभूत ठरला असता. अशावेळी स्वजीवाची पर्वा न करता जनहितार्थ हे युवक बाहेर पडले. बचाव कार्यास सुरवात केली. पुर्ण दिवस हे युवक हे कार्य करत होते. शापोरा नदीच्या अगदी शेजारी असल्यामुळे हा गाव चहुबाजूंने पाण्याच्या विळख्यात सापडला होता. या ग्रामीण भागातील अनेक गोशाळा पाण्याखाली गेल्याने गुरांचे सुखरूप जागी आणणे आवश्यक होते. या कार्यातही या युवकांनी यश मिळविले.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दिवसाच्या अंतापर्यंत सरकारची आपत्कालीन यंत्रणा किंवा सरकारी अधिकारी पोहोचले नाहीत. एवढेच नव्हे तर चक्क स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या गावाकडे दुर्लक्ष केलं, असा संताप या युवकांनी व्यक्त केलाय. या गावात शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. केळी बागायतीत पाणी घुसल्याने हातातोंडाशी आलेले पिकं नाहीसे झाले. सरकारकडून पुर्वसुचना न मिळाल्याने शेतामध्ये असलेले पाव्हरटिलर आणि शेतातील औजारे वाहून गेल्याचेही सांगितले जाते.

आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत असताना उपमुख्यमंत्र्यांनी तथा स्थानिक आमदार मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन कितपत खरे आहे आणि याचा फायदा हळर्ण गावातील शेतक-यांना कितपत होतो, हे पहाणे महत्वाचे ठरेल, अशी चर्चा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!