तरूणांनो सावधान! नोकरभरतीबाबत सतर्क रहा

काँग्रेस नेते एल्वीस गोम्स यांचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सरकारी नोकरभरतीसाठी बाकीचे आमदार पैसे घेतात तसे आपण कधी घेत नाही. हे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांचं आहे. एक जबाबदार मंत्रीच असं विधान करतो. यावरून नोकरभरतीचा या सरकारात कसा बाजार सुरू आहे हेच अधोरेखीत होतं, असा आरोप काँग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांनी केलाए. सहा महिन्यात दहा हजार पदांची भरती करू, असं जाहीर करून सरकारी नोकऱ्या जाहीर करण्याचं सत्रच सुरू आहे. या नोकरभरतीवर सर्वांचंच लक्ष लागून राहीलं आहे. कायदे आणि नियमांचं उल्लंघन करून आणि सरकारी दबावाला बळी पडून राजकीय वशिलेबाजीने नोकरभरती करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी सावध राहावं, असं सांगतानाच बेरोजगार तरूणाईने ही नोकरभरती पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या नोकरभरतीत अफरातफर किंवा बेकायदा प्रकार घडल्यास ताबडतोब संबंधीतांच्या नजरेस आणा, असं आवाहन एल्वीस गोम्स यांनी केलंय.

हेही वाचाः उपअधिक्षक पदे थेट भरती प्रकरणी 30 रोजी सुनावणी

वीज खात्याच्या 32 कर्मचाऱ्यांचं आयुष्य बरबाद

वीज खात्यात 2016 साली सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर्स पदांची भरती करण्यात आली होती. या भरतीला काही उमेदवारांनी आव्हान दिले होते. या भरती करून गेली पाच वर्षे वीज खात्यात सेवा बजावणाऱ्या सुमारे 32 कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे घरी जावे लागले. ही भरती राजकीय वशिलेबाजीने झाल्याचा ठपका खंडपीठाने ठेवला. या निवाड्यात सरकारविरोधात गंभीर ताशेरे ओढण्यात आलेत. गुणवत्तेवर आधारित नवी यादी तयार करून त्यामुसार नव्या उमेदवारांची भरती करण्यात आली. एवढे करून सरकारने संबंधीतांवर कोणतीच कारवाई केली नाही. हे सगळे कर्मचारी प्रचंड दहशतीखाली असून त्यांना नव्या नोकरभरतीत सामावून घेण्याचं आश्वासन दिलंए. वीजमंत्री निलेश काब्राल या प्रकरणी मुग गिळून गप्प का आहेत, असा सवाल एल्वीस गोम्स यांनी केला. खरं म्हणजे लोकायुक्तांनी या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेण्याची गरज आहे,असंही ते म्हणालेत.

आत्ताच नोकरभरती का?

राज्यात खाण व्यवसाय बंदच आहे. कोरोनामुळे आर्थिक ताण सुरू आहे. सरकारचं उत्पन्न वाढल्याचा कुठलाच प्रकार घडलेला नाही. या परिस्थितीत दहा हजार नोकरभरती करण्याचं सरकारचं नियोजन हे नेमकं कितपत योग्य किंवा खरं हा प्रश्नच आहे. गेली पाच वर्षं गप्प राहीलेलं सरकार आता निवडणुका जवळ आल्या ते पाहुन घाईगडबडीत ही नोकरभरती उरकायला बघतंय. भाजप सरकारला जनता कंटाळलीए. या सरकारला घरी पाठविण्याचा निर्धार जनतेनं केलाय आणि अशावेळी ही नोकरभरती केली जाणं म्हणजे सरकारी नोकऱ्यांच्या नावानं बाजार मांडण्याचाच हा प्रकार आहे. या नोकरभरतीवर काँग्रेसचं बारीक लक्ष लागून राहीलंय. काँग्रेसचा सरकारी नोकरभरतीला अजिबात विरोध नाही पण ही भरती पारदर्शक पद्धतीनं आणि गुणवत्तेवर आधारित व्हायला हवी. तसं झालं नाही तर या नोकरभरतीतील सगळे गैरव्यवहार आणि गैरप्रकार उघड करणार असल्याचंही ते म्हणाले. उमेदवारांनी सतर्क राहुन या भरतीकडे लक्ष द्यावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय.

हेही वाचाः सिद्धी नाईक प्रकरणः 5 पैकी कोणत्या बसमधून सिद्धीने केला प्रवास?

वीज खात्याच्या प्रकरणाचा अभ्यास हवा

केवळ सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पाच वर्षे सरकारी सेवेत असलेल्या 32 कर्मचाऱ्यांना अचानक घरी जावे लागणं ही खूपच गंभीर बाब आहे. कायदा महाविद्यालयांनी हे प्रकरण केस स्टडी म्हणून अभ्यास करावं. विद्यार्थ्यांसोबत या निवाड्याचं विश्लेषण करावं आणि कशा पद्धतीनं कायदा वाकवून बेकायदेशीरपणे नोकरभरती केली जाते याचा अभ्यास करावा. ही याचिका दाखल केलेल्या उमेदवारांचे खरोखरच कौतुक करावं लागेल. अन्यायाविरोधात कसं लढावं याचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिलाए. हा निवाडा अभ्यास केल्यास बेरोजगारांनाही नोकरभरती प्रक्रियेची माहिती मिळेल आणि तरूणाई अधिक सतर्क बनेल,असंही एल्वीस गोम्स म्हणालेत.

हा व्हि़डिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!