नवभारत निर्माणात युवक-युवतींनी आपलं योगदान द्यावं

मुख्यमंत्रीः आणीबाणीच्या निषेधार्थ भाजपतर्फे 'काळा दिन'

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: नवभारत निर्माण करण्यासाठी युवक-युवतींनी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी शुक्रवारी येथे केलं. तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणीबाणीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी भाजपतर्फे काळा दिन पाळण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

हेही वाचाः पेडणे मतदारसंघात ‘डास निर्मूलन फवारणी’

आणीबाणीला विरोध केलेल्या गोंयकारांचा सत्कार

आणीबाणीला विरोध केला म्हणून कारावास भोगावा लागलेल्या राजेंद्र आर्लेकर, मीनानाथ उपाध्ये, प्रा.श्याम कवठणकर, नागेश हेगडे आणि सुधीर परब यांना यावेळी मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदींच्या हस्ते मानपत्र, समय, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आलं.

लोकशाही टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं

देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यावेळच्या जनतेने आपलं योगदान दिलं ते स्वातंत्र्यसैनिक झाले. काँग्रेसच्या सरकारने देशावर आणीबाणी लादली आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला. ही लोकशाही टिकून ठेवण्यासाठी त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि लोकशाही टिकवण्यात आपलं योगदान दिलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नवनिर्माणाचा वसा घेतला आहे. त्यात युवकांनी आपलं योगदान देणं आवश्यक आहे. यानंतरच्या काही वर्षांनी आपण योगदान दिल्यामुळे देशाचं कसं नवनिर्माण झालं हे आजच्या पिढीला समजणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः बाबू कवळेकरांची लोकप्रियता भाजपला रूचेल?

माजी मंत्री आणि माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी यावेळी आणीबाणीतील काळ्याकुट्ट दिवसांच्या आठवणी जागवल्या. तानवडे यांनी सर्वांचं स्वागत केलं. सूत्रसंचालन भाजपचे माहिती तंत्रज्ञान विभाग संयोजक रुपेश कामत यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!