Cyclone | चक्रीवादळाला देण्यात आलेला तौक्ते शब्द कुठून आला? तौक्तेचा अर्थ काय?

तौक्ते वादळाचं नाव कसं पडलं?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोवा आणि महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. यानंतर 2021 मधील पहिलं चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंघावतय. ‘तौत्के’ असे या चक्रीवादळ नाव आहे. हे चक्रीवादळ दर तासाला अधिकाधिक सक्रिय होत आहे. तसंच त्याचा वेगही वाढू लागलाय. त्यामुळे किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

तौत्के हे चक्रीवादळ केरळ, गोवा, कोकण, मुंबईच्या समुद्रातून 18 मे रोजी मार्गक्रमण करेल. त्यानंतर ते भारतीय किनाऱ्याच्या समांतर उत्तरेकडे जाऊन गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ दाखल होईल. यादरम्यान भारतीय किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता नाही. पण या दरम्यान लक्षद्वीपसह केरळ, गोवा, कोकण किनारपट्टीलगत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कुठून आलं नाव?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे वादळ गुजरातच्या पश्चिम भागात किंवा पाकिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात 18 मे रोजी संध्याकाळी किंवा रात्रीच्या दरम्यान धडकेल. यावेळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर समुद्रात उंचच उंच लाटा धडकतील. तसेच वाऱ्याचा वेगही खूप जास्त असेल. अरबी समुद्रातील या चक्रीवादळला म्यानमारने तौत्के असे नाव दिले आहे.

तौक्ते म्हणजे?

तौत्के या शब्दाचा अर्थ lizard किंवा छोटी पाल असा होतो. यंदाच्या वर्षी भारतीय किनारपट्टी भागात धडकणारे हे पहिले चक्रीवादळ आहे. अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे.

या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यात ऑरेंज झोन जारी करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री पाऊस, आज ढगाळ वातावरण

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. दरम्यान, किनारपट्टी भागातील यंत्रणाही सतर्क झाल्यात. मासेमारीसाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर जहाजांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. शुक्रवारी या वादळाच्या पार्श्वभूमीवर जोरदार पाऊस झाला होता. तर आज आणि उद्याही मुसळधार पाऊस होण्याची शक्यताय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!