चिंताजनक! चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची रविवारी नोंद

एकूण कोरोना बळींचा आकडा 3 हजार 300च्या पार

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा कोविड बळींचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोविड बळींचा आकडा हा आता 3 हजार 300च्या पार गेलाय. राज्यात एकूण कोविड मृतांची संख्या ही आता 3 हजार 303वर जाऊन पोहोचली आहे.

रविवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार तिघांचा जीएमसीमध्ये मृत्यू झाला असून एक रुग्ण व्हिक्टर रुग्णालयात दगावला आहे. दरम्यान, 74 नवे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 64 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. 10 रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर 98 रुग्ण हे गेल्या 24 तासांत बरे झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. दुसरीकडे 7 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona update

चिंता कायम

सध्याच्या घडीला राज्यात एकूण 918 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा 97.60 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. एकूण राज्यात गेले काही दिवस कोरोना बळींचा आकडा हा कमी होत असल्याचं दिसून येत होतं. मात्र रविवारी पुन्हा एकदा कोरोना बळींचा आकडा वाढल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

राज्यात हळूहळू आता सर्वच व्यवहार पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहेत. राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेगही दिलासादायक आहे. 50 टक्क्यापेक्षा जास्त जणांनी राज्यात कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशातच आता पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनंही महत्त्वाची पावलं सरकारकडून उचलली जात आहेत.

कॅसिनोपाठोपाठ मंदिरंही सुरु

एकीकडे कॅसिनो गेल्या सोमवारपासून सुरु झाल्यापासून राज्यात पुन्हा एकदा पर्यटकांचा ओढा वाढतोय. तर दुसरीकडे सोमवारपासून फोंड्यातील मंगेशी मंदिरही भाविकांसाठी खुलं करण्यात येत आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत भाविकांना मंगेशी मंदिरात दर्शनासाठी भेट देता येऊ शकेल. देशभरातून गोव्यात मंगेशीला भेट देण्यासाठी लोकं येत असतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा गोव्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र कोविड एसओपींचं पालन करत पर्यटन सुरु ठेवण्याचं आव्हान प्रशासनासमोर राज्यातील सर्वसामान्य पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांसमोरही असणार आहे. सक्रिय रुग्णांचा वाढता आकडा आणि रविवारी समोर आलेली कोविड मृतांची वाढलेली आकडेवारी यामुळे कोविड एसओपींचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे.

आणि क्रूझचं गोव्यात आगमन!

इतकंच काय तर, तब्बल दीड वर्षानंतर राज्यात आजच पर्यटकांना घेऊन एक क्रूझ गोव्यात दाखल झाली आहे. मार्च 2020नंतर पहिल्यांच आज राज्यात अंदाजे दीड हजार पर्यटकांना घेऊन क्रूझ गोव्यात दाखल झाली आहे. एमव्ही कॉर्डेलिया असं या क्रूझचनं नाव असून 1500 पर्यटक या क्रूझनं गोव्यात आले आहेत. तर 600 क्रू मेम्बर या क्रूझवर होते. एमव्ही कॉर्डेलियाच्या आगमनानं देशी-विदेशी पर्यटकांचा ओढा येत्या काळात गोव्यात वाढेल, असा विश्वास पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी व्यक्त केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!