WORLD ENVIRONMENT DAY| निसर्ग रक्षण ही काळाची गरज

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोलीः निसर्ग रक्षणासाठी विद्यार्थी दशेपासूनच मुलांना प्रेरणा देण्याची गरज आहे. आपला परिसर, गाव तसंच पंचायत विभागात वृक्षसंपदा वाढवणं, ती टिकवून ठेवणं आणि औषधी वनस्पतींची जास्तीत जास्त लागवड करणं हा संकल्प प्रत्येकाने करून रोज पर्यावरण दिन साजरा करावा, असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं. साखळीतील हरवळे उपवन असलेल्या उद्यानाचं जागतिक पर्यावरण दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नेताजी सुभाष चंद्र बोस उपवन’ असं नामकरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचाः गोवा शिक्षण विभागाने मागवले कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे तपशील
मान्यवरांची उपस्थिती
या वेळी वन खात्याचे प्रधान मुख्य वनपाल सुभाष चंद्रा परिमल राय, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, संतोष फडते धावस्कर, शुभदा सावईकर, दयानंद बोर्येकर, रष्मी देसाई, यशवंत माडकर, आनंद काणेकर आदी उपस्थित होते.

मुलांना शिकता येण्यासारखं बरंच काही
औषधी वनस्पतींची लागवड करून या उपवनाला नवी उंची दिली असून दुर्मिळ वनस्पती लागवड तसंच अभ्यासकेंद्र म्हणून या ठिकाणी मुलांनाही शिकता येण्यासारखं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचाः VIRAL VIDEO | मोदीजी, आम्ही शिक्षणाची कुर्बानी द्यायला तयार आहोत
औषध तसंच फळांची रोपटी वितरित
या कार्यक्रमात सुभाश चंद्रा यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. यावेळी नूतन नामकरण फलकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपण केलं. तसंच उपस्थितांमध्ये विविध औषधी आणि फळांची रोपटी वितरित केली.