गोवा-महाराष्ट्र सीमेवर तिळारीनजीक होणार जागतिक दर्जाचा ‘अम्युझमेंट पार्क’

डिसेंबरमध्ये सुरू होणार फाईव्ह स्टार हॉटेल ; आमदार केसरकर यांचा पुढाकार

विनायक गांवस | प्रतिनिधी

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी देशातील पहिल्या पर्यटन जिल्हयाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आज आमदार केसरकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर तिळारी आंतरराज्य प्रकल्पाच्या जागेवर जागतिक दर्जाचे “अम्युझमेंट पार्क” हा महत्वकांक्षी पर्यटन प्रकल्प उभारण्याबाबत जलसंपदा विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळविला आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पाबरोबरच येत्या डिसेंबर महिन्यात जिल्हयातील पहिले पंचतारांकित हॉटेल सुरू होईल, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्यातून पुढील तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात “ताज”चे हॉटेल सुद्धा उभं करण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.

माजी राज्यमंत्री आ. केसरकर यांचे विशेष प्रयत्न सुरू होते. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच यांच्या अध्यक्षतेखाली केसरकर यांच्या महत्वपूर्ण बैठका पार पडल्या. मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यावेळी तिन्ही खात्याचे सचिव विजयकुमार गौतम, श्री. लाखे, कोकण पाटबंधारे मंडळाचे इडी, चिफ सेक्रेटरी आदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, तिळारीतील २६० एकर जागेत मातीची खाण असणाऱ्या मोकळ्या ठिकाणी ‘अ‍ॅम्यूझमेंट पार्क’ उभारण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. तर तिलारीच्या मागील भागात वन्य प्राणी संवर्धनाच केंद्र शासनाने निर्माण केल असून हे प्राणी डबलडेकर बोटमधून बघता यावेत यासारख्या अन्य प्रकारच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठीच्या प्रकल्पाला पाटबंधारे विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे. या प्रकल्पाला पर्यटन विभागानंही सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.

१० हेक्टर जमीन पर्यटन विकास महामंडळाला दिली असून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे या प्रकल्पाच सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाला पुर्ण सहकार्य करण्याच त्यांनी सांगितले आहे. यामुळे दोडामार्ग तालुका आंतरराष्ट्रीय पातळीवर येईल, असा विश्वास आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

याचबरोबर रखडलेले विर्डी प्रकल्प, सावंतवाडीतील शिरशिंगे प्रकल्प आदी प्रकल्पांच काम देखील लवकरच सुरू होणार आहे. अनेक पर्यटन प्रकल्प जिल्ह्यात यावेत यासाठी प्रयत्न सुरू असून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोस्टल रोडच सादरीकरण करण्यात आल आहे. या संदर्भात चर्चा देखील झाली आहे. तर तिलारीच पाणी या वर्षाअखेर वेंगुर्लेत पोहोचणार असून हे पाणी चिपी विमानतळापर्यंत न्याव, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

पर्यटन प्रकल्प वाढीसाठी हा निर्णय घेण्यात येत असून डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तर ताज हॉटेल येत्या ३ वर्षात उभं करण्याचा मनोदय असून मंत्री आदीत्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही बैठका सकारात्मक झाल्या असून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!