परप्रांतीय कामगारांच्या ‘घर वापसी’मुळे चिंता वाढली

राज्यातील बांधकाम क्षेत्राला पुन्हा ‘बुरे दिन’; मंत्री पाऊस्कर मात्र निश्चिंत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यांत परतत असल्याने गोव्यातील बांधकाम क्षेत्राला पुन्हा एकदा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत कामगारांअभावी राज्यात सुरू असलेले बहुतांशी प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ सरकार तसंच बांधकाम व्यावसायिकांवर येणार असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील बांधकाम व्यवसायाला फटक

राज्यात केवळ सोमवारपर्यंतच लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहतील. शिवाय अर्थव्यवस्थेला चालना देणारे बांधकाम व्यवसाय, औद्योगिक कंपन्या सुरूच ठेवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. तरीही परप्रांतीय कामगार वर्ग गोवा सोडून जात असल्याने त्याचा राज्यातील बांधकाम व्यवसायाला निश्चित फटका बसेल, अशी प्रतिक्रिया कामगार आयुक्त राजू गावस यांनी दिली. झुआरी पुल प्रकल्पावर दिवसाला ३०० ते ३५० कामगारांची नितांत आवश्यकता आहे. याशिवाय इतर अनेक ठिकाणी सरकारी प्रकल्प सुरू असून, तेथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार काम करीत होते. पण, लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने कामगार आपापल्या राज्यांत परतत असल्याने चालू प्रकल्पांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असं गावस म्हणाले.

अगोदरच करून ठेवंल होतं रेल्वेचं बुकिंग

गेल्या लॉकडाऊननंतर विविध राज्यांतून फार थोडे कामगार राज्यात आले होते. गोव्यात आल्यापासून करोनाचा पुन्हा प्रसार वाढू शकतो आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा आपल्या घरी परतावे लागते याची जाणीव या कामगारांना होती. त्यामुळे काही जणांनी अगोदरच रेल्वेचे बुकिंग करून ठेवलं होतं. तर, काही कामगार महिन्याभरापूर्वीच परतले होते, असंही त्यांनी नमूद केले.

कोरोनाच्या भीतीने कामगार परतीच्या वाटेवर

दरम्यान, राज्यातील करोनाचा वाढता प्रसार आणि लॉकडाऊनचे संकट या भीतीमुळेच परप्रांतीय कामगार पुन्हा एकदा परतत आहेत. त्याला सरकार काहीच करू शकत नाही. परप्रांतीय कामगार परतल्यानंतर त्याचा मोठा फटका बांधकाम व्यवसायावरच होणार आहे. करोना प्रसार वाढल्यानंतर पर्यटकांनी गोव्यात येणं थांबवले आहे. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरन्ट व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने तेथे काम करणारे कामगार परतले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असं गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (जीसीसीआय) अध्यक्ष मनोज काकुलो यांनी सांगितले.

मंत्री दीपक पाऊस्कर म्हणतात…

  • पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यांत जात असतात. त्याचप्रमाणे यावेळीही ते जात आहेत. त्याचा बांधकाम व्यवसायाला अजिबात फटका बसणार नाही.
  • जे परप्रांतीय कामगार परतत आहेत ते रोजंदारी किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करणारे आहेत. कंत्राटदारांकडे कायम असलेले कामगार मात्र अजून गोव्यातच आहेत. आपण त्यांच्याकडून याची खात्रीही केली आहे. त्यामुळे सरकारी प्रकल्पांसमोर संकटे येणार नाहीत.
  • सरकारी प्रकल्पांसाठी आवश्यक इतका कामगारवर्ग सध्या राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे स्वयंपूर्ण गोवा मोहिमेंतर्गत येणारे प्रकल्पही अजिबात रखडले जाणार नाहीत.
  • सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदारांची प्रलंबित बिले मोठ्या प्रमाणात फेडली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडून प्रकल्प पुढे नेण्यास हयगय होणार नाही.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!