जूनपासून तीन सिलिंडर मोफत

योजनेच्या मसुद्याचे काम सुरू; पहिल्या टप्प्यात बीपीएल कुटुंबांना लाभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : वर्षाकाठी तीन घरगुती सिलिंडर मोफत देण्याच्या योजनेचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. ही योजना पुढील महिन्यापासून म्हणजेच जूनपासून कार्यान्वित होईल. पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना याचा लाभ मिळेल. त्यानंतर ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्वच कुटुंबांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी दिली.

बीपीएल गटात राज्यातील ३७ हजार कुटुंबे

घरगुती गॅस ‌सिलिंडरच्या किमतींनी शनिवारी हजाराचा आकडा ओलांडला आहे. पण, सरकारने जाहीर केलेल्या ‘तीन सिलिंडर मोफत’ योजनेची अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे गरीब आणि गरजू लोकांच्या मनात ‘जगायचे कसे’ असा विचार घोळत आहे. दरम्यान, मंत्री गावडे यांनी जूनपासून योजनेची कार्यवाही होईल, असे आश्वासन दिल्याने त्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
बीपीएल गटात राज्यातील ३७ हजार कुटुंबे आहेत. या कुटुंबांना पहिल्या टप्प्यात योजनेचा लाभ मिळेल. त्यानंतर योजनेचा विस्तार होईल.

जूनपासून योजनेची कार्यवाही सुरू

ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे, अशी सर्व कुटुंबे योजनासाठी पात्र ठरतील. योजनेचे निकष आणि अन्य अटी तयार करण्याचे काम सुरू आहे. योजना अजून निश्चित झालेली नाही. मसुदा तयार होताच जूनपासून योजनेची कार्यवाही सुरू होईल. गरीब, गरजू लोकांना विनामूल्य सिलिंडर योजनेचा लाभ मिळावा, असा सरकारचा हेतू आहे, असे मंत्री गोविंद गावडे यांनी म्हटले आहे. घरगुती सिलिंडरचे दर प्रचंड वाढले आहेत. ही दरवाढ देशपातळीवर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर वाढल्याने सिलिंडरच्या किमती वाढवाव्या लागल्या, असे स्पष्टीकरण मंत्री गावडे यांनी दिले आहे.

घोषणेवर कसलीच अंमलबजावणी नाही

विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने गोमंतकीय जनतेला वार्षिक तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात भाजपचे​ सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात म्हणजे २९ मार्च रोजी याबाबत घोषणा केली. शिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ग्रामीण विकास खात्यामार्फत एप्रिलपासूनच योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली होती. पण, एप्रिल महिना संपत आला तरी घोषणेवर कसलीच अंमलबजावणी झाली नाही.

नवीन तारीख जाहीर

दरम्यान, २१ एप्रिल रोजी मंत्री गावडे यांनी या योजनेबाबत नवी तारीख जाहीर केली. १ मे पासून या योजनेची कार्यवाही होईल, असे त्यांनी त्यादिवशी स्पष्ट केले. तसेच ही योजना केवळ बीपीएल कुटुंबांनाच देण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे, असे सांगितल्याने जनतेच्या मनातही चिंतेचे काहूर माजले होते. आता मंत्री गावडे यांनी नवीन तारीख जाहीर केली आहे. किमान तेव्हातरी योजनेची कार्यवाही करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!