म्हापसा पालिकेची जुनी मामलेदार इमारत जमिनदोस्त करण्याचं काम सुरू

शंभर वर्षं जुनी पोर्तुगीजकालीन इमारत झाली जीर्ण; इमारत पाडण्यासाठी 3 लाखांचं कंत्राट

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः येथील धोकादायक स्थितीत असलेली जुन्या मामलेदार कार्यालयाची इमारत जमिनदोस्त करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलं आहे. आठ वर्षांनंतर या जीर्ण बनलेल्या इमारतीला हटवण्याचा मुहूर्त पालिकेला अखेर सापडला आहे.

हेही वाचाः मोठी बातमी | भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

शंभर वर्षं जुनी पोर्तुगीजकालीन इमारत

शंभर वर्षांपूर्वीची ही पोतुर्गीजकालीन इमारत विनावापर आणि पालिका मंडळाच्या देखभाली अभावी जीर्ण होऊन मोडकळीस आली होती. आठ वर्षांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करून त्या जागी बहुमजली वाहनतळ किंवा पाच मजली व्यवसायिक इमारत उभारण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतला होता. पण ही इमारत जमिनदजोस्त करून त्या जागी हे दोन्ही प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा निर्णय बारगळला. दोन वर्षांपुर्वी गेल्या सप्टेंबर 2019 मध्ये ऐन गणेश चतुर्थीवेळी याच इमारतीच्या समोरची उपनिबंधकांची इमारत कोसळल्यामुळे पालिका मंडळ आणि पालिका अधिकारी तातडीने जागे झाले होते. लागलीच ही इमारत कोणतीही जीवीतहानी होण्यापूर्वी जमिनदोस्त करून त्या जागी बहुमजली प्रशासकीय इमारत प्रकल्प उभारण्याचा ठरावही पालिका मंडळाने घेतला होता. पण चार वेळा निविदा काढूनही पालिकेला बोलीदार न सापडल्याने ही योजना शितपेटीत बंद करावी लागली होती.

हेही वाचाः Royal Enfield च्या चाहत्यांना धक्का, Bullet 350 सह लोकप्रिय बाईक्स महागल्या

जीर्ण झाल्याने इमारत जमिनदोस्त करण्याचा निर्णय

गोवा मुक्ती नंतर सरकारने या इमारतीत मामलेदार कार्यालय थाटलं होतं. मरड येथे नवीन सरकारी संकुल इमारत उभारल्यानंतर त्यात मामलेदार कार्यालयाचं स्तलांतर झालं आणि तेव्हापासून सुमारे 35 वर्षं ही एक मजली इमारत विनावापर पडून होती. जीर्ण झालेल्या इमारतीत तळ मजल्यावर पालिकेने रेड क्रॉस या संस्थेला जागा दिली होती. रेड क्रॉसचं स्तलांतरण केल्यानंतर गेली आठ वर्षं ही इमारत विनावापर पडून होती. शेवटी पालिकेने ही इमारत जमिनदोस्त करण्याचं काम हाती घेतलं आहे.

हेही वाचाः दोनपेक्षा अधिक मुले असल्यास कुटुंब गमावणार हे सरकारी लाभ

3 लाखांचं कंत्राट

या कामासाठी 3 लाखांचं कंत्राट देण्यात आलं आहे. सदर कंत्राटदाराकडून आगामी दोन चार दिवसांत ही इमारत जमिनदोस्त करण्यात येणार आहे. इतर पालिकेच्या जीर्ण झालेल्या जुन्या इमारतींचं सर्वेक्षण करून त्यादेखील जमिनदोस्त करण्याचा पालिका मंडळाचा विचार आहे, असं नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!