जनजीवन सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू

अग्निशमन, पोलिस, PWD, WRDचं काम जोरात; पुढील 8 दिवसांत अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची राज्य सरकारचा विश्वास; केंद्राकडून सर्वतोपरी मदतीची हमी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पडझड झालीए. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना या चक्रीवादळाने दणका दिल्यामुळे प्रचंड प्रमाणात लोकांचं नुकसान झालंय. या वादळाने दोन बळी गेले असले, तरी वित्त हानी मोठी झालीए. चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्ववत करण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. ठिकठिकाणी स्थानिक जनतेकडूनही मदतीचा हात पुढे करण्यात आल्यानं या कामाला गती मिळाली आहे.

पुढील 8 दिवसांत अधिकाधिक नुकसान भरपाई देऊ

तौक्ते चक्रीवादळाने रविवारी राज्यात दाणादाण उडवली. जोरदार पाऊस आणि सोबत 70 ते 80 किलोमीटर वेगाचा सोसाट्याचा वारा यामुळे प्रचंड हानी झाली. किनारी भागांत पाण्याची पातळी वाढल्यानं तेथील वस्तींचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी, बागायतदारांचं उभं पीक आडवं पडलंय. ग्रामीण भागांतील लोकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. या सर्व नुकसानीचं सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. स्थानिक पंचायत आणि पालिकांनीही आपापल्या क्षेत्रातील नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहचवावी. पुढील आठ दिवसांत अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलंय.

तौक्तेमुळे कोलमडलं वर्षभराचं आर्थिक नियोजन

कृषीमंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही कृषी विभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गावांना भेट देऊन शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेत. काजू, आंबा, फणस बागायतदार हवालदिल झालेत. एन मौसमात आणि शेवटच्या घटकेला निसर्गाने घात केल्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. बहुतांश शेतकरी काजू आणि आंब्याच्या उत्पन्नावर आपल्या संपूर्ण वर्षभराचं नियोजन करतात आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलं आहे.

फ्रंटलाईन लढवय्यांची कसोटी

कोरोना महामारीच्या या काळात आरोग्य फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे जनजीवन पूर्ववत करण्यासाठी आता पोलिस, अग्निशमन दल, पीडब्लूडी, डब्लूआरडी आदी खात्यांच्या कामगारांचं जोरदार काम सुरू आहे. यात पालिका आणि पंचायत पातळीवरील कामगारही त्यांना साथ देत आहेत. अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळून पडल्याने तसंच झाडं वीज खांबांवर पडल्यानं वीज पुरवठा खंडीत झालाय. तो पूर्ववत करण्याचं मोठं आव्हान वीज खात्यासमोर आहे. मुख्य तथा अंतर्गत रस्ते झाडांच्या पडझडीमुळे वाहतूकीसाठी खंडीत झाल्यामुळे ते मोकळे करण्याचं काम सुरू आहे. वीज खंडीत झाल्यामुळे त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही होणार असल्यानं पुढील किमान एक आठवडा लोकांना या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

केंद्राकडून सर्वतोपरी मदतीची हमी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. एकूणच परिस्थितीती माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली. यावेळी केंद्राकडून सर्वतोपरी मदत राज्याला मिळेल, अशी हमी दिली आहे.

18 किलोमीटरच्या गतीनं पुढे सरकतंय तौक्ते

अरबी समुद्रावरचं तौक्ते चक्रीवादळ आज सकाळी सहा वाजता अलिबागच्या किनाऱ्यालगत होतं. किनाऱ्यापासून शे दिडशे किलोमीटरचं अंतर कायम राखत उत्तरेकडे वाटचाल करणाऱ्या या वादळाची पुढे सरकण्याची गती वाढली आहे. ते आता ताशी 18 किलोमीटरच्या गतीनं पुढे सरकत असल्यानं याक्षणी मुंबई लगतच्या समुद्रात असण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः तौक्ती चक्रीवादळामुळं गोव्यातली विमानसेवा ठप्प

वादळाची तीव्रता आणखी वाढली

वादळाची तीव्रता आणखी वाढली असून आता त्याचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग ताशी 150 ते 160 किलोमीटर आहे. गती वाढल्यामुळे तौक्ते वादळ आता 18 तारखेला पहाटेच पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे सध्या मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू असून पालघरमध्येही वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढू लागला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!