तालिबान्यांकडून म​हिला स्वातंत्र्य नष्ट करण्यास सुरुवात

मुलींना शिक्षणासाठी इतर देशांत न पाठवण्याचे फर्मान; गोव्यात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थिनीचा दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अफगाणिस्तानातील महिलांना सुरक्षा आणि स्वातंत्र्य देण्याची हमी तालिबान देत आहे; पण तेथील परिस्थिती वेगळीच आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी मुलींना इतर देशांमध्ये शिक्षणासाठी न पाठवण्याचं तसंच मुलांना सहावीपेक्षा जास्त शिक्षण न देण्याचं फर्मान पालकांना सोडलं आहे, अशी माहिती गोवा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या फायेझा झस्कारी या अफगाण विद्यार्थिनीने बुधवारी ‘प्रुडंट’ वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

हेही वाचाः यंदाचं इफ्फीचं स्वरूप कोविड स्थितीवर अवलंबून

तालिबानचे प्रवक्ते टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून आपण मुलींचं शिक्षण, सुरक्षा आणि स्वातंत्र्याला अजिबात धक्का लावणार नसल्याची ग्वाही जगाला देत आहेत. पण प्रत्यक्षात ते घरोघरी जाऊन मुलींना इतर देशांमध्ये शिक्षणासाठी पाठवू नका, त्यांना तत्काळ देशात बोलावून घ्या, मुलांना सहावीपेक्षा जास्त शिक्षण देऊ नका, असं सूचनावजा इशारे देत असल्याचं आपल्या आईने आपल्याला फोनवरून सांगितलं आहे, असं फायेझा म्हणाली.

कितीही आश्वासनं दिली तरी तालिबानी आपलं खरं रूप दाखवणारच

तालिबानी दहशतवाद्यांनी २५ वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या बाबतीत काय केलं होतं, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळे आता ते कितीही आश्वासनं देत असले तरी पुढे आपलं खरं रूप दाखवणारच आहेत. तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तान उद्धवस्त करण्याच्या हेतूनेच आपल्या देशात घुसले आहेत. अफगाण नागरिकांना ते कधीही सुरक्षा देऊ शकणार नाहीत. नागरिक, महिलांचा विविध पद्धतीने छळ करणं हेच त्यांचं धोरण राहील, असंही ती म्हणाली.

हेही वाचाः कला अकादमीच्या नूतनीकरणात घोटाळा

अभ्यासावरून लक्ष उडालं

तालिबानने अफगाणिस्तानात प्रवेश केल्यापासून आपण फोनवरून वारंवार आपल्या कुटुंबियांशी बोलत आहे. तेथील परिस्थिती ऐकून घेत आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आपलं अभ्यासावरून लक्ष उडालं आहे. कुटुंबियांची काळजी सतावत आहे. त्यातच तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील इंटरनेट, मोबाईल कनेक्टिव्हिटीमध्येही अडथळे आणले आहेत. त्यामुळे कुटुंबाशी संपर्क साधणंही कठीण झालं आहे, असं फायेझा हिनं सांगितलं.

हेही वाचाः PMO च्या आदेशानं मोदी मंदिरातली मूर्ती हटवली !

करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

अफगाण नागरिकांनी अनेक वर्षे तालिबानी दहशतवाद्यांचे अन्याय, अत्याचार सहन केले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वत:चा देश सोडला आहे. आपण आणि आपल्या भावांनीही अफगाणिस्तान सोडून इतर देशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. पण, आपल्या वडिलांनी अफगाणिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही अजूनही आपल्या देशातच राहत आहे. गोव्यातील शिक्षण पूर्ण करून आपल्या देशात जावं. तिथे जाऊन नोकरी करावी. आपल्या ज्ञानाचा देशाला फायदा करून द्यावा, असं स्वप्न आपल्यासह इतर अफगाण विद्यार्थ्यांनी बाळगलं आहे. पण, तालिबान्यांच्या दहशतीमुळे आमचं करिअरही उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे, असंही फायेझा झस्कारी हिने नमूद केलं.

गोवा, भारताबाबत प्रेम, आदर!

गोव्यात आम्ही सर्वच अफगाण विद्यार्थी सुरक्षित आहोत. त्यामुळे गोवा आणि भारताविषयी आपल्या मनात नेहमीच प्रेम आणि आदर राहील, असं फायेझा म्हणाली. माझ्यासह अनेक अफगाण विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत. पण भारत सरकारने आम्हाला शिक्षणाबाबतीत मोठा पाठिंबा दिला आहे. सरकारकडून आम्हाला वेळोवेळी पूर्ण सहकार्य मिळत असतं, असंही फायेझा झस्कारी हिने स्पष्ट केलं.

हा व्हिडिओ पहाः MATRUCHAYA | फोंड्याच्या मातृछाया संस्थेची तयारी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!