पिसुर्लेत चिरेखाणीत महिलेची आत्महत्या

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपईः सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील एका अवैध चिरेखाणीच्या खंदकात अंजली राजू जाधव (वय 16, सध्या रा. पिसुर्ले, मूळ रा. विजापूर कर्नाटक) या महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. सदर महिला चिरेखाणीत काम करत होती. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.
हेही वाचाः उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदावर शोबित सक्सेना यांची बदली
बुधवारी घडली घटना
पिसुर्ले आवडार या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीच्या पाण्याने भरलेल्या खंदकामध्ये ही घटना बुधवारी सकाळी घडली. सदर महिला बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न तिच्या पतीने आणि इतरांनी केला. मात्र संध्याकाळी तिचा मृतदेह एका पाण्याने तुडुंब भरलेल्या खंदकामध्ये तरंगताना आढळला.
हेही वाचाः म्हादई अभयारण्य अधिकाऱ्याकडून सरकराकडे पोलीस संरक्षणाची मागणी
मृतदेह गोमेकॉत तपासणीसाठी
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून संध्याकाळी उशिरा पाण्यामधून सदर मृतदेह बाहेर काढला. दरम्यान घटनेचा पंचनामा वाळपईच्या पोलिसांनी केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे.
हेही वाचाः कोविड-19 चाचण्या घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा
नागरिकांमध्ये चर्चांना उधाण
राजू आणि त्याची पत्नी अंजली गेल्या वर्षंभरापासून या भागामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीवर मजूर म्हणून काम करत होते. महिलेच्या आत्महत्येचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही. मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीमध्ये तिने आत्महत्या केल्यामुळे सरकारी यंत्रणेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या महिलेचा जीव गेल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीच्या व्यवसायावर सरकार खरोखरच कारवाई करणार का ? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्या चिरेखाणीवर हा आत्महत्या करण्याचा प्रकार घडलाय, त्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.