जीएमसीतून बाळाचं अपहरण केलेल्या महिलेला अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः गोवा पोलिसांच्या तपास कार्याला अखेर यश मिळालंय. जीएमसीतील एका महिन्याच्या बाळाच्या अपहरणाचा गुंता अखेर सुटला. पोलिसांनी सालेलीतून ताब्यात घेतलेल्या विश्रांती गांवस नामक महिलेची अखेर कबुली. शुक्रवारी दुपारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून दिवसाढवळ्या एका महिन्याच्या अर्भकाचं अपहरण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलीये. ही महिला सत्तरीतील सालेली गावची असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीये. तसंच बाळ सुरक्षित असल्याचंही समजतंय.
शुक्रवारी दुपारी जीएमसीतून पळवलं बाळ
शुक्रवारी दुपारी जीएमसीतून 1 महिन्याचं बाळ पळवण्याची घटना घडली. संशयित महिलेने शुक्रवारी दुपारी गोमेकॉ परिसरात मातेच्या हातातून अर्भकाला खेचून घेतलं असता मातेने आरडाओरडा सुरू केला. मात्र, त्या महिलेने अतिशय चलाखीने तिथून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध सुरू केला असता, ती मोटारसायकल पायलट करून पणजी बसस्थानकावर गेल्याची माहिती समोर आली. पुढे तपास केला असता ती महिला दुसऱ्यामोटारसायकल पायलटच्या मदतीने पर्वरीतील ‘तीन बिल्डींग’ या ठिकाणी गेल्याचं समजलं होतं. तिथून पुढे कांसा थिवी, अस्नोडा येथे गेल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी शोधा मोहीम सुरू केली होती. अखेर ती महिला सत्तरीत सापडलीये.
पुढील तपासासाठी महिलेला नेलं डिचोली पोलिस स्थानकात
या प्रकरणी पीडित मातेच्या तक्रारीवरून उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रात्री उशीरापर्यंत तसंच शनिवारी पूर्ण दिवस म्हापसा तसंच डिचोली परिसरात संशयित महिलेचा शोध घेत होतं. अखेर शनिवारी संध्याकाळी पोलिसांच्या तपासाला यश आलंय. पुढील तपासासाठी सदर महिलेला पोलिसांनी डिचोली पोलिस स्थानकात नेल्याची खबर आहे.
अपहरणाचा घटनाक्रम…
१. विश्रांती गांवसने जीएमसीतून एका महिन्याच्या बाळाला पळवलं.
२. अपह्रत बाळाला घेऊन विश्रांती सव्वातीनच्या सुमारास म्हापसा करासवाड्यात पोहोचली.
३. करासवाडा येथे विश्रांतीने लिफ्ट घेऊन गाठलं मुळगाव.
४. मुळगावातून विश्रांती एका खासगी बसने पोहचली सालेलीत.
५. वाळपई पोलिसांना सुगावा लागताच घेतले बस ड्रायव्हर, कंडक्टरला ताब्यात
६. चौकशीअंती पोलिस पोहोचले विश्रांतीच्या घरी
७. विश्रांतीकडून बाळ ताब्यात आणि अपहरणाचा झाला पोलखोल