श्रीपाद नाईक स्थानिक राजकारणात येणार?

खासदार विनय तेंडुलकरांच्या ट्वीटर बाँममुळे खळबळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात विधानसभा निवडणूका केवळ सात महिन्यांवर येऊन ठेपल्याएत. भाजपला पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी मोठ्या राजकीय रणनितीची गरज आहे. 2017 मध्ये फक्त 13 जागा जिंकून आलेल्या भाजपनं विरोधी पक्षाचे आमदार फोडून या कार्यकाळात सत्तेवर चिकटून राहण्यात यश मिळवलं खरं. परंतु या सत्तेच्या आधारावर आगामी 2022 च्या निवडणूकीत बहुमत मिळालं नाही, तर पक्षासाठी ती मोठी लाजीरवाणी गोष्ट ठरणार आहे. या अनुषंगानेच भाजपच्या धुरीणांनी वेगवेगळ्या शक्याशक्यतांची पडताळणी करायला सुरुवात केलीए. अलिकडेच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या फेररचनेत श्रीपाद नाईक यांच्या पदरात मात्र राज्यमंत्रीपद मिळाल्याने त्यातून काही प्रमाणात नाराजी प्रकटली होती. श्रीपाद नाईक यांचं आयुषमंत्रीपद काढून घेतल्यामुळेही नाराजीचा सुर होता. अशावेळी श्रीपाद नाईक हे स्थानिक राजकारणात उतरणार अशी चर्चा सुरू झाली होती. आता राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी या चर्चेला उघडपणे तोंड फोडून राजकीय खळबळ उडवलीए.

हेही वाचाः ACCIDENT | मुरमुणेत चिऱ्यांची वाहतूक करणारा ट्रक नदीत पडला

विनय तेंडुलकरांचा ट्वीट बाँब

राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी एक भला मोठा इंग्रजी ट्वीट संदेश पाठवलाय. हे ट्वीट बरंच व्हायरल झालंय. या ट्वीट संदेशात विनय तेंडुलकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्थानिक राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचं स्वागत आहे, असं म्हटलंय. ज्येष्ठ नेत्यांचा पक्ष बांधणीत समावेश केल्यास आणि गोव्याच्या राजकारणात काही सकारात्मक बदल करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यास आदरच आहे, असंही ते म्हणतात. या ट्वीट संदेशात विनय तेंडुलकर यांनी श्रीपाद नाईक यांची केलेली स्तुती भलतेच संकेत देत आहेत. अगदी सामान्य पातळीवर श्रीपाद नाईक यांच्यासोबत काम करण्याची आमची तयारी आहे, असंही तेंडुलकर या ट्वीट संदेशात म्हणतात. कठोर परिश्रम घेणारा हा नेता स्थानिक पातळीवर लाभल्यास ते राज्यासाठी खूपच भल्याचं ठरेल. श्रेष्ठींनी असा काही निर्णय घेतल्यास त्याचं स्वागतच करू, असंही तेंडुलकर म्हणतात. विनय तेंडुलकर हे खासदार बनल्यानंतर अचानक ट्वीटरवर बरेच सक्रिय बनले आहेत. हा भला मोठा इंग्रजीतला ट्वीट संदेश राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. हा संदेश विनय तेंडुलकर यांच्या ट्वीटरवरून व्हायरल झाल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत भाजपात मोठे संघटनात्मक बदल घडण्याचे संकेत मिळत आहेत.

नाराज भंडारी समाजाची भाजपला गरज

गोव्यातला सर्वांत मोठा घटक असलेला भंडारी समाज भाजपवर बराच नाराज आहे. राज्य मंत्रिमंडळात भंडारी समाजाला योग्य स्थान मिळालेलं नाही. मिलिंद नाईक हे मंत्रिमंडळातील एकमेव भंडारी मंत्री असले, तरी त्याबाबत समाज समाधानी नाही. भंडारी समाजाच्या नाराजीचा फायदा उपटण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. काँग्रेसमधून रवी नाईक यांना भाजपात आणण्याचीही व्युहरचना पक्षात आखण्यात येत होती, अशीही खबर मिळालीए. श्रीपाद नाईक असताना रवी नाईक यांना पक्षात आणण्यात काहीजणांनी नकार दर्शवल्यानं अखेर श्रीपाद नाईक यांनाच स्थानिक राजकारणात का आणू नये,असा एक विचार प्रवाह पक्षात सुरू झालाय. विनय तेंडुलकर यांच्या ट्वीट संदेशामुळे याला पुष्टी मिळालीए. श्रीपाद नाईक यांच्याकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल की त्यांना प्रत्यक्ष निवडणूकीत उतरवलं जाईल, याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. श्रीपाद नाईक यांच्यासाठी सुरक्षीत मतदारसंघ निवडण्याचंही काम सुरू झालंय. पर्वरी, डिचोली, कुंभारजुवे, फोंडा आणि मडकई मतदारसंघांचा प्राथमिक विचार सुरू आहे. त्यासाठी एव्हानाच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन स्थानिक राजकारणात उतरविण्याचीही तयारी सुरू आहे, अशीही खात्रीलायक माहिती प्राप्त झालीए.

हा व्हिडिओ पहाः Video | MG on Online Education | गावागावात नेटवर्क आणि विद्यार्थ्यांना स्मार्टफोन द्या ; मगोची मागणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!