मुख्यमंत्री डॉक्टरचा कोट चढवतील?

मुंबईच्या महापौरांना जमलं, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जमेल?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशावर ओढवलेलं कोरोना महामारीचं संकट खूप भयंकर आहे. या परिस्थितीत भरडले जात आहेत ते कोविड योद्धे. कोविड-19 च्या लढाईत आपल्या आरोग्य सेविकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण थोडा कमी करण्यासाठी मुंबईच्या महापौर पुढे आल्यात. समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून, खरा लोकप्रतिनिधी कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलंय. तब्बल 18 वर्षांनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी नर्सचा ड्रेस चढवला आणि त्या मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये गेलं दीड वर्षं कोविड रुग्णांची सेवा करत आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत डॉक्टरचा कोट चढवतील का? असा प्रश्न विचारलाय.

मुख्यमंत्री डॉक्टरचा कोट चढवतील?

आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घालून दिलेल्या उदात्त उदाहरणाचं अनुकरण करतील का? आयुर्वेदिक डॉक्टरची पदवी प्राप्त केलेले शिवाय सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतलेले आमचे दोतोर प्रमोद सावंत गळ्यात स्टेथोस्कोप आणि अंगात डॉक्टरचा कोट चढवतील का? असे प्रश्न आयरिश रॉड्रिग्स यांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध करून मुख्यमंत्र्यांना विचारलेत.

हेही वाचाः संकटातही संधी! नर्स आणि डॉक्टर्ससाठी नोकरीची संधी

मुंबईच्या महापौर करू शकतात, तर मग गोव्याचे मुख्यमंत्री का नाही?

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जे पेशाने डॉक्टर आहेत, ते आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण थोडा कमी करण्यासाठी डॉक्टरचा कोट पुन्हा चढवून त्यांना नक्कीच प्रोत्साहित करू शकतात, मदत करू शकतात असं रॉड्रिग्स यांनी म्हटलंय. कोविडच्या या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागत आहे आणि आरोग्य सेवा पुरवण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जमिनीवर झोपवण्याची वेळ आली आहे. या कोविड योद्ध्याचं ओझं थोडं हलकं करताना या संकट प्रसंगी योग्य व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री मदत नक्कीच करू शकतात, असंही रॉड्रिग्स म्हणालेत.

हेही वाचाः गोव्यातून महाराष्ट्रात जायचा कोरोना रुग्णांचा प्लान फसला!

सायबा, तुका भिवपाची कायच गरज ना..

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर 18 वर्षांनंतर नर्सचा ड्रेस परिधान करून हॉस्पिटलमध्ये सेवा बजावू शकतात, तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नक्कीच पुढे येऊ शकतात. खरं तर मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन राज्यातील डॉक्टर्सचा हुरुप वाढवण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणेत उतरून एक डॉक्टर म्हणून आज भूमिका बजावण्याची गरज आहे. निदान तेव्हा तरी त्यांना आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण समजेल आणि कदाचित आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री काहीतरी चमत्कार करतील, असा टोला रॉड्रिग्स यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. शिवाय समाजाची सेवा करण्यासोबतच, यामुळे मुख्यमंत्र्यांना प्रचलित गंभीर वास्तव प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभवदेखील मिळेल. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही हे कराच. सायबा, तुका भिवपाची कायच गरज ना..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!