घरे-जमिनींची मालकी देणार; पीडब्ल्यूडी कामगारांना न्याय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची हमी; विधानसभा निवडणुकांपर्यंत उपलब्ध असलेल्या वेळेत प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य सरकार हे बहुजन समाजाचे आणि बहुजन समाजासाठी आहे. भूमी अधिकारीता विधेयकाची संकल्पना समजून घेतल्यास हे दिसतं. गोमंतकीय बांधव राहत असलेली घरं, त्यांच्या वापरात असलेली जमीन त्यांच्या नावावर आजही नाही. ती जमीन आणि घरं नावावर करून देण्याचा हा कायदा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हेही वाचाः डिचोली तालुक्यात मुसळधार चालूच

उपलब्ध वेळेत प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलणार

कुळ मुंडकार खटलेही प्रलंबित आहेत. सारे प्रश्न सोडवायचेच आहेत. कोविड महामारीमुळे प्रश्न सोडवण्याच्या वेगाला खीळ पडली असली, तरी सरकारची इच्छाशक्ती बुलंद आहे. ती तसूभरही कमी झालेली नाही. कोविड व्यवस्थापनावर सरकारला जास्त वेळ द्यावा लागला असला तरी या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं नाही. माझं सरकार १०-१५ वर्षं सत्तेवर नाही. मला काम करण्यास जो कालावधी मिळाला त्यातील बहुतांश वेळ हा कोविड कालावधी आहे. तरीही जनतेचे प्रश्न सोडवण्याप्रती सरकार कटीबद्ध आहे. यापुढे विधानसभा निवडणुकीपर्यंत हाती असलेल्या वेळेत हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार निश्चितपणे ठोस पावले टाकणार आहे.

पीडब्ल्यूडी कामगारांना न्याय

दीड हजार युवक सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. हे खातं अनेक वर्षं सांभाळणारेही त्यांचा प्रश्न सोडवू शकले नव्हते. माझ्या सरकारने त्यांच्या वेतनाचा केवळ प्रश्नच सोडवला नाही, तर त्यांना नोकरीची हमी दिली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकार सर्वसामान्यांच्या संवेदनांची दखल घेणारं आहे. हा प्रश्न माझ्यासमोर आला तेव्हा तो कसा सोडवता येईल याचा विचार केला. प्रसंगी नियम बदलावे लागले तर ते बदलू, पण अनेकवर्षं सरकारसाठी सेवा बजावणाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ असं ठरवलं. चार ते पाच हजार रुपयांच्या तुटपुंज्या वेतनावर ते काम करत होते. १ हजार ४९० जणांना नोकरीची हमी सरकारने आता दिली. असे अनेक निर्णय सांगता येतील ज्यातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न, जे आजवर सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिले होते ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारने केला आहे. याहीपुढील काळात समोर येणारे प्रश्न सोडवत, जनतेला न्याय देत हे सरकार मार्गक्रमण करणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!