हनी सिंग विरोधात पत्नी शालिनीची तक्रार

तक्रारीनंतर कोर्टानं हनी सिंगला बजावली नोटीस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय रॅपर हनी सिंग विरोधात पत्नी शालिनी तलवारने तक्रार दाखल केल्यामुळे जोरदार चर्चेला सुरुवात झालीय. घरगुती हिंसाचारविरोधी कायद्याअंतर्गत शालिनीने ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कोर्टाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे.

शालिनीने केलेल्या तक्रारीनंतर दिल्लीच्या कोर्टाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे आणि त्या नोटीशीला २८ ऑगस्टपूर्वी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. शालिनीने तिच्या आणि हनी सिंगच्या नावावर असलेली प्रॉपर्टी परवानगीशिवाय विकल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप हनी सिंगवर केला आहे.

शालिनीने तक्रारीमध्ये हनी सिंगवर काही गंभीर आरोप केले आहेत. मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. शालिनीने हनी सिंगसोबतच त्याच्या आई-वडिलांवर देखील आरोप केले आहेत. तसेच शालिनीने कोर्टाला विनंती केली की तिच्या आणि हनी सिंगच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या विक्रीवर देखील बंदी घालण्यात यावी.

हनी सिंग आणि शालिनी यांनी २०११ मध्ये लग्न केले. त्यापूर्वी ते एकमेकांना जवळपास २० वर्षे ओळखत होते. त्यांनी दिल्ली येथील फार्महाऊसवर लग्न केले होते. पण त्यांच्या लग्नाविषयी फार कमी लोकांना माहिती होती. काही दिवसांपूर्वी हनी सिंगचे नाव अभिनेत्री डियाना उप्पलशी जोडले जात होते. पण या सर्व अफवा असल्याचे नंतर हनी सिंगने स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!