२२ कोटी ५० लाखाच्या आयव्हरमेक्टिन घोटाळ्यावर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री गप्प का?

भाजपकडुन गोव्याचा प्रयोगशाळा व गोमंतकीयांचा गिनिपिग म्हणुन वापर ; अमरनाथ पणजीकर यांचा घणाघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कॉंग्रेस पक्षाने उघड केलेल्या रु. २२ कोटी ५० लाख रुपयांच्या आयव्हरमेक्टिन गोळ्या खरेदी घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंना बोलण्याचे धैर्य नाही, यावरुनच सदर घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. भाजप लोकांच्या आजाराचा बाजार करीत असुन, गोव्याचा “प्रयोगशाळा” म्हणुन व गोमंतकीयांचा “गिनिपिग” म्हणुन वापर करण्यात येत आहे अशी टिका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

भाजप सरकार आज केवळ कमिशन खाणे व माया जमविण्याच्या नादात गोव्याचा प्रयोगशाळा म्हणुन वापर करीत आहे.कोविड लॉकडाऊन काळात असाच प्रचार करुन आयुष मंत्रालयाने गोळ्यांचे वाटप केले होते व सदर गोळ्यांच्या सेवनाने कोरोना दूर राहणार अशी ग्वाही दिली होती. आज दुसरी लाट आली असताना व लोक मृत्युमुखी पडत असताना सदर गोळ्यांचा प्रचार केवळ प्रसिद्धीसाठी व जुमलेबाजीसाठी भाजपने केला हे उघड आहे असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी आयव्हरमेक्टिन गोळ्या सर्व आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा पाच दिवसांमागे केली होती. परंतु त्याच दिवशी जागतीक आरोग्य संघटनेने पत्रक जारी करुन सदर गोळ्यांचे सेवन हे आरोग्य तपासणीनंतरच केले जावु शकते असे स्पष्ट निर्देश दिले असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

आज मॅरिलॅंड विश्व विद्यालयाच्या संसर्गीक रोगांचे प्रमुख डॉ. फहिम युनूस यांनी सदर गोळ्यांचे सेवन करण्यास लावण्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचे वक्तव्य म्हणजे “इंटेलेक्चुअल ॲरर” असे म्हटले आहे. सदर “ॲरर” गोव्यात भयंकर ” हॉरर” घडवुन आणेल असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.

आयव्हरमेक्टिन १२ मिलीग्राम गोळ्या घेतल्यास कोविड संसर्ग दूर राहतो हा सल्ला गोव्याचे भ्रष्ट आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना कोणी दिला? या उपचाराला वैज्ञानिक आधार कोणता आहे? पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय काउंसिल तसेच जागतीक आरोग्य संघटनेची सदर उपचार प्रणालीस मान्यता आहे का हे गोमंतकीयांना कळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब याची दखल घ्यावी व लोकांसमोर खुलासा करावा अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

सदर गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी निवीदा जारी करण्यात आली होती का? किती जणांनी निवीदा भरल्या होत्या? आरोग्यखात्याने कोणाची निवड केली? आज देशात वा जगात कुठेही ही उपचार पद्धती सुरू आहे का व असल्यास त्याचे परिणाम काय आहेत हे भाजप सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे.

कॉंग्रेस पक्ष अजुन एक दिवस वाट पाहणार असुन, सरकारने यावर खुलासा न केल्यास आम्ही लोकांना सदर गोळ्यांचे सेवन न करण्याचे उघड आवाहन करणार आहोत असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला.

भाजप सरकार कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेल्या जुमला उपचार प्रणाली आणुन आपली माया जमवित आहे असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला. आज भाजप सरकारवर लोकांचा विश्वासच उडाला असुन, केवळ भ्रष्टाचार करुन लोकांच्या आजारातुन पैसे कमविण्याचे भाजपचे धोरण आता सर्वांना कळले आहे.

वैज्ञानिक आधार असलेलीच उपचार पद्धती वा औषधे सरकारने लोकांना द्यावीत हे कॉंग्रेस पक्षाचे ठाम मत आहे असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

गोमंतकीयांनी सरकारच्या जुमलेबाजीला बळी न पडता, उपचार प्रणालीसाठी वैज्ञानीक आधार देण्याची मागणी सरकारकडे करावी. अधिकृत आरोग्य संघटना व अधिकारिणीची परवानगी असेल तरच औषधांचे सेवन करावे असे आवाहन अमरनाथ पणजीकर यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!