समुद्राच्या पाण्याला कोण रोखणार?

ब्यवसायाच्या नावावर वाळूच्या अस्तित्वावर घाला

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः समुद्राच्या पाण्याला फक्त वाळूच्या टेकड्याच रोखू शकतात. मात्र या वाळूच्या टेकड्यांना कोण रोखणार? पर्यटन हंगामात पर्यटन व्यवसाय थाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात या वाळूच्या टेकड्यांचं सपाटीकरण करून व्यवसाय थाटले जातात. परिणामी पावसाळ्यात आणि भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी किनाऱ्यावर येतं. त्यावेळी सपाट केलेल्या वाळूच्या टेंबाकडून पाणी हळुहळू उरलेल्या टेकड्या घेऊन समुद्रात जातं. हेच चित्र मोरजी किनारी भागात पहायला मिळतंय.

वाळूच्या टेकड्यांचं केलं सपाटीकरण

मांद्रे मतदारसंघातील केवळ मोरजी, मांद्रे आणि हरमल या किनारी भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात वाळूच्या टेकड्या होत्या. या टेकड्यांना कुणीच जमीन मालक हात लावत नसत. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वी किनारी भागातील लोकवसत्यांना याच टेकड्या संरक्षण देत असत. कालांतराने किनारी भागातील जमिनीवर बिगर गोमंतकीयांचं लक्ष गेलं. पर्यटनाचे वारे वाहू लागले. वाळूच्या टेकड्यांवर आघात होत असताना त्या कितीही किंचाळल्या तरीही त्यांची हाक कुणाला ऐकू येत नाही. सपासप वार केले जातात, बुलडोझर फिरवले जातात आणि सपाट करून लोकवसत्यांना धोका निर्माण केला जातो. तरीही संवेदना नसलेली सरकारी यंत्रणा, स्थानिक पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा, लोकसभेने निवडून आणलेले लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प राहतात.

वाळूच्या टेकड्यांचं अस्तित्व धोक्यात

मोरजी पंचायत क्षेत्रात पूर्वी टेंबवाडा ते गावडेवाडा या तीन किलोमीटर किनारपट्टीवर मोठमोठ्या वाळूच्या टेकड्या होत्या आणि याच टेकड्या किनाऱ्याला आणि लोकवस्तीला समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण देत असत. या तीन किलोमीटर किनाऱ्यावर कोणत्याच प्रकारची दगडी किंवा काँक्रिटची भिंत नव्हती. आज काल किनाऱ्यावर नजर मारल्यास वाळूच्या टेकड्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं दिसतंय. उघड्या डोळ्यांनी किनारे उध्वस्त होताना पाहण्यापलीकडे कुणीही काहीही करू शकत नाही.

ब्यवसायाच्या नावावर वाळूच्या अस्तित्वावर घाला

पर्यटनाच्या नावाखाली वाळूच्या अस्तित्वावर घाला घालायला व्यावसायिक निघाला आहे. कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या नादात पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय. पैसा कमवण्याच्या नादात वाळूचे उंचवटे सपाट करून त्यावर काँक्रिटची जंगलं उभी केली जातात. ज्यांची संरक्षण करण्याची जबाबदारी असते, तेच वातानुकुलीत ऑफिसात बसून कोण तक्रार देतो का त्याची वाट पाहत असतात आणि तक्रार आली की समझोता केला जातो, असा दावा सामाजिक कार्यकर्त्ये उदय शेट्ये यांनी केलाय.

तर पर्यटक किनाऱ्यावर का येतील?

किनारी भागात फेरफटका मारला, तर आता किनारेच नष्ट झाल्याचं चित्र दिसतं. पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी चाललेली धडपड पाहता जर किनारेच सुरक्षित राहिले नाही, तर पर्यटक किनाऱ्यावर का येतील? काँक्रिटची जंगलं पाहण्यासाठी? असा सवाल जागृत नागरिकांनी उपस्थित केलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | FLOOD | पुरामुळे कोट्यावधींच नुकसान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!