WHO च्या ट्विटनंतर RG च्या मनोज परबांची सरकारवर टीका

कोरोनावरील उपचारादरम्यान आयव्हरमेक्टिनच्या वापरास WHO कडून परवानगी नाही; WHO च्या मुख्य वैज्ञानिक स्वामीनाथन यांचं ट्विट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने कोरोना रुग्णावरील उपचारादरम्यान आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर करु नका, असा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. ‘नव्या लक्षणांसाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाचा वापर करण्यापूर्वी त्याची सुरक्षा आणि प्रभाव क्षमता तपासणं गरजेचं आहे. WHO क्लिनिकल ट्रायल सोडून कोरोना उपचारासाठी आयव्हरमेक्टिन औषधाच्या वापराला परवानगी देत नाही’, असं स्वामीनाथन यांनी म्हटलंय.

अद्याप ठोस प्रमाण मिळालेलं नाही

डॉ. स्वामीनाथन यांनी जर्मनीतील दिग्गज हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस कंपनी कर्मचं एक जुनं वक्तव्य ट्विटरवर शेअर केलंय. फेब्रुवारी 2021 मध्ये जारी केलेल्या या वक्तव्यात म्हटलंय की, वैज्ञानिक कोरोनावरील उपचारासाठी आयव्हरमेक्टिनची सुरक्षा आणि प्रभाव क्षमता तपासण्यासाठी सर्व सध्यस्थितीतील आणि नव्या अभ्यासांचं परिक्षण करत आहे. आतापर्यंत कोरोनाविरोधात या औषधाच्या प्रभाव क्षमतेबाबत कोणतंही ठोस प्रमाण मिळालेलं नाही.

मनोज परबांची सरकारवर टीका

दरम्यान रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी)चे मनोज परब यांनी याच विषयावरून गोवा सरकारवर निशाणा साधलाय. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसंच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना परबांनी ट्विट केलंय. ट्विट करताना परब म्हणालेत, गोव्याच्या मंत्र्यांवर अजून एक आंतरराष्ट्रीय बातमी. गोवा सरकारने कोरोनावरील उपचारासाठी 18 वर्षावरील रुग्णांवर उपचारासाठी आयव्हरमेक्टिनच्या वापसाचा सल्ला दिल्यानंतर WHO ने त्यावर स्टेटमेंट दिलंय. कोरोना रुग्णावरील उपचारादरम्यान आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर बरोबर नसल्याचं WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय. गोवा सातत्याने बातम्यांमधून झळकतोय, मात्र चुकीच्या पद्धतीने. कारण आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राज्याची धुरा सांभाळण्यात अयशस्वी ठरलेत, असं म्हणत परबांनी आरोग्यमंत्री तसंच मुख्यमंत्र्यांना टॅग केलंय.

गोवा सरकारकडून आयव्हरमेक्टिनच्या वापराला परवानगी!

मागील दोन महिन्यात दुसऱ्या वेळी WHO ने आयव्हरमेक्टिनच्या वापरावरुन इशारा दिला आहे. यापूर्वी मार्चमध्ये WHO ने सांगितलं होतं की, या औषधाच्या प्रवाभाबाबत खूप कमी प्रमाण मिळालं आहे. दरम्यान, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी हे ट्वीट करण्याच्या एक दिवसापूर्वीच गोवा सरकारने कोरोनावरील उपचारासाठी 18 वर्षावरील रुग्णांवर उपचारासाठी आयव्हरमेक्टिनच्या वापसाचा सल्ला दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!