थोडी तरी जनतेची शरम करा

अमरनाथ पणजीकर यांचा मॉविन गुदीन्हो यांना टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदीन्हो हे नव्या वाहतूक नियमासंबंधीची अधिसुचना जारी करतात. अधिसुचनेत 16 एप्रिलपासून दंडात्मक कारवाई होईल, असं सांगतात. मग स्वतःच ही तारीख बेकायदा पद्धतीनं पुढे ढकलतात आणि 1 मे पासून कार्यकाही करू,असं ठोकतात. शेवटी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विनंतीवरून ही अधिसुचना मागे घेत असल्याचं जाहीर करतात. हा एकंदर घटनाक्रम पाहिल्यानंतर वाहतूकमंत्र्यांनी स्वतःची जरी नसली, तरी किमान जनतेची तरी शरम करण्याची गरज आहे, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.

मंत्रिमंडळात कट्टी बाळगतात काय

लहान मुलं कट्टीचा खेळ खेळतात. या खेळात एकमेकांशी न बोलणं याला कट्टी म्हणतात. राज्याच्या प्रशासनाचा पोरखेळ बनवलेल्या या सरकारातील मंत्री एकमेकांशी कट्टी खेळ खेळतात काय,असा सवाल पणजीकर यांनी केला. वाहतूक नियमासंबंधीची अधिसूचना मुख्यमंत्र्यांना न विचारताच जारी केली होती काय,असा प्रश्न त्यांनी केला. सर्वसामान्य लोकांवर परिणाम करणारा हा निर्णय मॉविन गुदिन्हो यांनी आपल्या पक्षाला विश्वासान न घेताच ठरवला काय, असा टोलाही त्यांनी हाणला. ही सगळी नाटकं जनतेला मुर्ख बनवण्यासाठीच केली जाताहेत. केंद्राकडून हा कायदा अंमलात आणण्याची सक्ती केली जातेय. इथे मात्र या सरकारने लोकांना इतकं सतावलं आहे की हा कायदा अमलात आला तर लोकच कायदा हातात घेऊन या सरकारला अद्दल घडवणार असल्याचा आरोप पणजीकरांनी केलाय.

अपघात बळींची किमत योजनेतून करताय काय ?

राज्यातील रस्ते अपघातांत शेकडो जणांचे बळी जाताहेत. कंत्राटदारांकडून कमिशन उकळून रस्त्यांची कामं निकृष्ट पद्धतीनं केली जाताहेत. या कंत्राटदारांना जाब विचारण्याचं सोडून रस्ते अपघातात बळी गेलेल्या कुटुंबियांना सरकारी योजनेचा लाभ घ्या,असा सल्ला देणारं हे सरकार किती अमानवी आहे, हेच दिसून येतं, असा हल्लाबोल पणजीकरांनी केलाय. रस्ते अपघातात बळी गेलेल्या कुटुंबियांच्या हातात भरपाईचा चेक देऊन नामानिराळे होऊ पाहणाऱ्या या सरकारने संवेदनाच विकून टाकलीय, असा आरोपही त्यांनी केलाय.

टॅक्सी चालकांना का खेळवताय ?

टॅक्सी व्यवसायिक गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन करताहेत. त्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने पाहिलं जात नाही. गोवा माईल्सला ते विरोध करताहेत. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं सोडून त्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त केलं जात आहे. टॅक्सी व्यवसायिकांना मीटर बसवणार असाल तर मग मीटरसंबंधीच्या त्यांच्या प्रश्नांबाबतही स्पष्टीकरण सरकारने करायला हवं. खाजगी बस वाहतूकदारांच्या पोटावर लाथ मारली जातेय. केवळ कमिशनमुळे इलेट्रीक बसेस कदंबच्या ताफ्यात आणल्यात. कदंबकडे चार्जिंगची व्यवस्था नसल्याने या बसेस विनावापर पडून आहेत. प्रदूषण कमी करण्याच्या बहाण्याने या बसेस आणून खाजगी बस व्यवसायिकांची उपासमार करण्याचा नतदृष्टपणा हे सरकार करीत आहे, असा आरोप करून बहुजन समाजाला संपविण्याचा विडाच या सरकारने उचलल्याची टीका अमरनाथ पणजीकर यांनी केलीये.

एमव्हीआर आणि दिलीप बिल्डकॉनचे हुजरे

एकीकडे एमव्हीआर आणि दुसरीकडे दिलीप बिल्डकॉन या दोन बड्या कंत्राटदारांचे हुजरे हे सरकार बनलंय. या दोन्ही कंत्राटदारांकडून त्यांच्या कामात होणारी हयगय आणि दुर्लक्षपणा याचा जाब विचारण्याची धमका या सरकारला नाही. एमव्हीआरसमोर तर हे सरकार लोटांगणच घालतं. लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा मुक्त परवाना या दोन्ही कंत्राटदारांना दिलाय काय, असा सवालही त्यांनी केलाय.

रस्ते निर्धोक करा आणि मगच कार्यवाही करा

नवे रस्ते वाहतूक नियम सरकारला तत्काळ लागू करता येणार नाहीत. आधी सगळे रस्ते निर्धोक करा आणि मगच या कायद्याची कार्यवाही करा,असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिलाय. हे नियम लोकांवर लादण्याचा प्रयत्न झाला तर जनता अजिबात गप्प राहणार नाही,असंही त्यांनी निक्षून सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!