2020 संपलं, गोव्यात घडलेल्या घडामोडी घ्या जाणून…

सर्वच क्षेत्रात लक्षवेधी घटना

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाच्या सावटाखाली 2020 हे वर्ष संपलं. या वर्षात गोव्यात अनेक घटनांनी समाजमन ढवळून निघालं. राजकीय पटलापासून ते पर्यावरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या. या घडामोडींचा हा संक्षिप्त आढावा…

जानेवारी :

 • चार वाघांच्या हत्येमुळे खळबळ
  2020च्या सुरुवातीलाच म्हादई अभयारण्यात चार वाघांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली. या वाघांना विष घालून मारण्यात आल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं.
 • तानावडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी
  दुसरीकडे, भाजपमध्ये स्थानिक पक्षनेतृत्वात महत्त्वाचा बदल झाला. माजी आमदार सदानंद शेट तानावडे यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

फेब्रुवारी :

 • वेंडल रॉड्रिग्स यांचा अलविदा
  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर आणि गोव्याचे सुपुत्र पद्मश्री वेंडल रॉड्रिग्स यांचं कोलवाळमधल्या घरी झोपेतच निधन झालं. पर्यावरणविषयक संवेदनशीलता हा त्यांचा स्वभावगुण होता. समलिंगी संबंधांच्या बाजूने त्यांनी नेहमी आवाज उठवला.
 • फ्रान्सिस परेरा उर्फ बॉयला पुन्हा अटक
  दुसरीकडे, अनेक क्रॉसची मोडतोड करण्याच्या प्रकरणात संशय असलेल्या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला कुडचडेत अटक करण्यात आली. मंत्री नीलेश काब्राल यांच्या नावाची पाटी फोडण्याचाही आरोप त्याच्यावर लावण्यात आला. सुमारे दीडशे धार्मिक स्थळांची विटंबना करण्याचा त्याच्यावर आरोप होता. मात्र बहुतेक प्रकरणात पुराव्याअभावी त्याची सुटका झाली.

मार्च :

 • ‘धूम’च्या नादात तिघांनी गमावला जीव
  वेर्णा औद्योगिक वसाहतीतल्या उतरणीवर धूम स्टाईलने कार चालवण्याच्या नादात तिघांनी जीव गमावला. भरधाव कार उलटली आणि खोलगट भागात दगडावर आदळली. यात दोघा अल्पवयीनांसह एका युवकाचा मृत्यू झाला.
 • दोन मुलं, बायकोला मारुन आत्महत्या
  दुसरीकडे, खोर्ली-म्हापसा इथल्या गॉड्स गिफ्ट इमारतीत राहणार्‍या शाहू धुमाळे यानं आपल्या दोन लहान मुलांसह पत्नीला मारून स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. आर्थिक विवंचनेतून त्यानं हे टोकाचं पाउल उचलल्याचं निष्पन्न झालं होतं.

एप्रिल :

 • कोरोनामुळे राज्य सरकारकडून सीमाबंदी
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या सीमा, विमान आणि रेल्वे वाहतूक एप्रिल अखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. दुकानं बंद असल्यानं जीवनावश्यक वस्तूंचा काही दिवस तुटवडा निर्माण झाला, तर अनेक वस्तूंचे भाव वाढले.
 • म्हापसा अर्बना परवाना निलंबित
  दरम्यान, म्हापसा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेनं रद्द केला. त्यामुळे ठेवीदारांचे साडेतीनशे कोटी अडकून पडले. रिझर्व बँकेनं घातलेले निर्बंध संपुष्टात येण्याआधीच बँकेचा परवाना रद्द झाल्यानं खातेदारांना धक्का बसला.

मे :

 • मास्क घाल गोंयकारा…
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांमध्ये जागृती करण्यासाठी मडगावच्या कलाश्री महिला मंडळानं मास्क घाल गोयकारा ही चित्रफित प्रसारित केली.

जून :

 • पहिल्या कोरोना बळीची नोंद
  मडगावच्या कोविड इस्पितळात पहिल्या कोरोना बळीची नोंद जूनमध्ये झाली. मोर्ले-सत्तरी इथल्या 85 वर्षांच्या व्यक्तीचं कोरोनामुळे निधन झालं.
 • सांताक्रूझ गँगवॉरमध्ये एकाचा मृत्यू
  दुसरीकडे, पणजीजवळच्या सांताक्रूझमध्ये गँगवॉरनं पुन्हा डोकं वर काढलं. इम्रान बेपारी याच्या घरावर हा हल्ला झाला. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी नउजणांना अटक करण्यात आली.

जुलै :

 • पोलिसांनीच उधळली पत्रकार परिषद
  सत्तरीच्या गुळेलीत प्रस्तावित असलेल्या आयआयटीला विरोध करण्याबाबत शेळ मेळावलीत स्थानिकांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद पोलिसांनी उधळून लावली. यामुळे पोलिसांवर मोठी टीका झाली.
 • पुन्हा तीन दिवसांचं लॉकडाउन
  दुसरीकडे, कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्यानं सरकारनं खबरदारी म्हणून तीन दिवसांचं लॉकडाउन घोषित केलं. यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी रांगा लावल्या.

ऑगस्ट :

 • राज्यपालांकडून सरकारला घरचा अहेर
  राज्यपालांसाठी नवं राजभवन बांधण्याचा विषय चांगलाच गाजला. राज्य सरकारच्या प्रस्तावाला खुद्द राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच विरोध केला. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना हा प्रस्ताव व्यवहार्य नाही, असं मत त्यांनी नोेंदवलं.
 • माजी सभापती अनंत शेट कालवश
  दरम्यान, विधानसभेचे माजी सभापती तसेच मयेचे माजी आमदार अनंत शेट यांचं गोमेकॉत निधन झालं. त्यांच्यावर सात दिवस उपचार सुरू होते.

सप्टेंबर :

 • राज्याच्या सीमा पुन्हा खुल्या
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या गोव्याच्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या एसओपींचं पालन करून बार आणि रेस्टॉरंट्स सुरू करण्यात आली.
 • लोकायुक्तांकडून सरकारला कानपिचक्या
  दरम्यान, लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी सरकारला झोंबणारे काही निवाडे दिले. मजूर घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी शिफारस त्यांनी सरकारला केली. आमदार पांडुरंग मडकईकर यांची बेहिशेबी मालमत्तेबद्दल चौकशी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
 • भरदिवसा सराफाचा खून
  दुसरीकडे, मडगावात भरदिवसा स्वप्नील वाळके या सराफाचा खून झाल्यानं खळबळ उडाली. चाकूचे वार करत स्वप्नील यांचा खून करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर तिसरा संशयित शरण आला.

ऑक्टोबर :

 • ‘मोले वाचवा-गोवा वाचवा’
  वीज प्रकल्पासाठी मोले अभयारण्यात प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यासाठी लोकांनी मोले वाचवा गोवा वाचवा ही मोहीम हाती घेतली. रेल्वे रुळांचं दुपदरीकरण, वीज प्रकल्प, कोळसा वाहतूक, महामार्गाचं रुंदीकरण याला विरोध करण्यासाठी हे जनआंदोलन उभारण्यात आलं.
 • कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका
  दरम्यान, म्हादईचं पाणी वळविल्याबद्दल कर्नाटकविरुद्ध गोवा सरकारनं अवमान याचिका दाखल केली.

नोव्हेंबर :

 • सेलिब्रिटींनी सोडली लाज…
  दोन सेलिब्रिटींच्या आक्षेपार्ह वागण्यामुळे नोव्हेंबरमध्ये खळबळ उडाली. मॉडेल पूनम पांडेनं काणकोणात अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अभिनेता मिलिंद सोमण यानं नग्नावस्थेत धावतानाचा स्वत:चा फोटो व्हायरल केला. त्याच्यावर जोरदार टीका झाली.
 • राघव चढ्ढा विरुद्ध नीलेश काब्राल वाद
  दुसरीकडे, आम आदमी पार्टीचे दिल्लीतील नेते राघव चढ्ढा यांनी गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांना वीज दरांबाबत जाहीर चर्चेच आव्हान देउन राजकीय खळबळ उडवून दिली.
 • विलास मेथर यांचा खून
  दरम्यान, बिल्डरशी असलेल्या वादातून पर्वरीत विलास मेथर या तरुणाचा भरदिवसा जाळून खून करण्यात आला. या प्रकरणी संशयितांना पोलिसांनी कणकवलीतून ताब्यात घेतलं.

डिसेंबर :

 • हीरक महोत्सवी मुक्तिदिन
  गोव्याचा हीरकमहोत्सवी साठावा मुक्तिदिन 19 डिसेंबरला साजरा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थिती लावून गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या.
 • झेडपी निवडणुकीत भाजपचा झेंडा
  दरम्यान, झेडपी निवडणुकीत भाजपनं विरोधकांचा धुव्वा उडवत दोन्ही जिल्ह्यात वरचष्मा राखला.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!