आप आणि मगो एकत्र येण्याच्या ‘या’ 3 शक्यता काय सूचित करतात?

राजकीय घडामोडींना कमालीचा वेग

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि ढवळीकर बंधूंमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. आप आणि मगो एकत्र येऊन निवडणुका लढवतील, असं समीकरण येत्या निवडणुकीत पाहायला मिळणार का? यावरुन वेगवेगळे युक्तीवाद राजकीय वर्तुळात रंगवले जात आहेत. पण खरंच आप आणि मगो एकत्र येण्याच्या किंवा न येण्याचा ३ शक्यता काय आहेत? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. या दौऱ्याच्या पहिल्यात दिवशी ढवळीकर बंधू केजरीवालांच्या भेटीसाठी पोहोचले. या भेटीवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं नसतं तरच नवल! झालंही तसंच. मगो आणि आप एकत्र आगामी विधानसभा निवडणुका लढणार की काय, अशी कुजबूज सुरु झाली. पण सुदिन ढवळीकर यांनी मात्र युतीसाठी भेट घेतली नसल्याचं म्हटलंय.

kejrival

केजरीवालांची सदिच्छा भेट घेतली अससल्याचं सुदिन ढवळीकर यांनी म्हटलंय. असं असलं तरी मगो आमदार सुदिन ढवळीकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, यांच्या या भेटीदरम्यान, महत्त्वाची चर्चा झाली असणार हे नक्की. त्यामुळे या भेटीनंतर मगो आणि आप एकत्र येण्याच्या शक्यताही नाकारल्या जाऊ शकत नाहीत. नेमक्या या तीन शक्यता काय आहेत?

शक्यता क्रमांक १. नवं राजकीय समीकरण?

मगो आणि आप एकत्र आल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नवं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकेलं. आताच युतीच्या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार नसलं, तरी तसं वातावरण तयार केलं जात असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येण्याचीही शक्यता आहेच.

शक्यता क्रमांक २. उत्तरेत आप दक्षिणेत मगो?

सुदिन ढवळीकरांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करत आप आणि मगो एकत्र निवडणुका लढवू शकतात, असंही जाणकार सांगतात. तसं झाल्यास मगो आपली ताकद दक्षिणेत तर आप उत्तरेत पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवेल, असा अंदाज वर्तवला जातोय. आप आणि मगो यांची विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी ही युती भाजप आणि काँग्रेससाठीही डोकेदुखी ठरू शकते.

800x450 sudin dhavlikar

शक्यता क्रमांक ३. युतीमुळे बंडाळीची भीती?

मगो आणि आपची युती जरी झाली, तरीही प्रत्यक्षात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही युती अजिबात रूचणारी नाही, असं राजकीय जाणकार सांगतात. नव्यानेच पक्षबांधणी करत असलेल्या आम आदमी पार्टीला मगोबरोबर जाणे धोक्याचे ठरू शकते. मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतदार आपकडे वळू लागले आहेत. अशात मगोशी नाते जोडले तर हा घटक पक्षापासून दूरावू शकतो, असंही बोललं जातंय.

एकूणच काय तर, मगो आणि आपमध्ये जागा वाटपाबाबत नक्कीच चर्चा होऊ शकते. जिथे मगोप उमेदवार असेल तर तिथे आपने पाठींबा द्यावा आणि जिथे आप उमेदवार असेल तर तिथे मगोने पाठींबा द्या. हा फॉर्म्यूला दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकतो, असं समीकरणही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अर्थात या सगळ्यावर आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांनीही राजकारणावर ढवळीकर बंधूंशी चर्चा केल्याचं म्हटलंय. त्यामुळे ही चर्चा आता पुढे कुठपर्यंत जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!