आम्ही आयपॅकच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो, तृणमूलला नाही

‘तृणमूल’ला भेटल्याचा आग्नेल, यतीशकडून नकार; काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: काँग्रेसचे नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांच्यासह काँग्रेस नेते आग्नेल फर्नांडिस, यतीश नाईक यांच्यासह काही नेते तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भेटल्याची चर्चा गेले दोन दिवस राज्यात सुरू आहे. गुरुवारी आग्नेल आणि यतीश यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही आयपॅकच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. पण तृणमूलला भेटलोच नसल्याचे म्हणत आपल्यासंदर्भात अफवा पसरवली जात असल्याचे स्पष्ट केलं.

त्यामुळेच माझं नाव तृणमूल काँग्रेसशी जोडलं जातंय

लुईझिन फालेरो तृणमूल काँग्रेसला भेटले आहेत का किंवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे फालेरो नेतृत्व करू शकतात का, असे प्रश्न विचारलं असता, आग्नेल फर्नांडिस यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. पण, काँग्रेसच्या काही नेत्यांनी फालेरो यांना गेल्या काही वर्षांत अपमानित केलं आहे. त्यामुळेच त्यांचं नाव तृणमूल काँग्रेसशी जोडलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांत आपलं फालेरो यांच्याशी बोलणं झालेलं नाही. आपण त्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला यावेळी भाजपला हरवायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

आग्नेल फर्नांडिस यांची खदखद

– प्रदेश काँग्रेसमधील एकाधिकारशाहीला अनेक नेते कंटाळले आहेत. नव्यांना पक्षात घेताना जुन्या आणि निष्ठावंतांना विचारात घेतले जात नसल्याचं सांगत आग्नेल फर्नांडिस यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली.
– पक्षाचे दोन नेते आपल्याला हवं तेच करत आहेत. एक नेता स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी मायकल लोबोंना काँग्रेसमध्ये आणू पाहत आहे. पण, या निर्णयात आम्हाला सहभागी करून घेतलं जात नाही. उद्या मायकल यांना काँग्रेसमध्ये आणले, तर पुढे ते इतर आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार नाहीत याचा विचार संबंधित नेता देऊ शकेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
– भाजपच्या विद्यमान आमदारांना काँग्रेसमध्ये घेण्यास आमचा तीव्र विरोध राहील. काँग्रेसची उमेदवारी पक्षाच्या निष्ठावंतांनाच मिळणं गरजेचं आहे, असंही फर्नांडिस यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!