आम्हाला भाजपसोबत युती करून चौथ्यांदा आत्महत्या करायची नाही

मगोपचे सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टोक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: मगोचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी मुंबईत जाऊन भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केल्याचे स्पष्ट होताच राज्यात भाजप-मगो युतीच्या चर्चा झडल्या. पण, आपण फडणवीस यांची भेट घेतली असली तरी भाजपसोबत अजिबात युती करणार नाही. आम्हाला भाजपसोबत युती करून चौथ्यांदा आत्महत्या करायची नाही, असे सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

प्रत्येकवेळी भाजपने मगोला धोका दिला आहे

मी केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे, तर याआधी ‘आयपॅक’चे प्रशांत किशोर, काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासह भाजप, तृणमूल पक्षांच्या नेत्यांनाही भेटलो आहे. त्यांनी मला भेटायला बोलावले किंवा ते भेटायला आले तर त्यांच्याशी चर्चा करण्यास मी नकार देऊ शकत नाही. पण येत्या  विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती मलाच नको आहे. प्रत्येकवेळी भाजपने मगोला धोका दिलेला आहे. यापूर्वी भाजपशी युती करून आम्ही तीनवेळा आत्महत्या केली आहे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.       

युतीचा निर्णय कार्यकारी समिती घेते

युतीचा निर्णय कार्यकारी समिती घेत असते. त्यामुळे यावेळीही युतीसंदर्भात कार्यकारी समिती जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मगो पक्षाने सुरुवातीपासूनच भाजपसोबत युती न करण्याचा निर्धार करीत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, मध्यंतरीच्या काळात सुदिन आणि दीपक या दोन्ही बंधुंनी आप नेते तथा दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करीत आप-मगो युतीच्या दिशेने पावले टाकली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांतील युतीची चर्चा थंडावली आहे. भाजपला हरवण्यासाठी निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी करण्यासाठी गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत इतर पक्षांना साद घालत आहे. पण, मगोने मात्र भाजपसोबत युती तसेच आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!