‘आम्ही गुंड किंवा जमीन बळकावणारे नाहीत, आम्ही नीज गोंयकार आणि खरे भूमिपुत्र आहोत’

सरकारने आम्हाला न्याय द्यावा - नाईक कुटुंबीय

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : आम्ही जमीन बळकावेली नाही किंवा आम्ही गुंड नाहीत. आम्ही नीज गोंयकार असून आमच्या घरावर जी कारवाई झाली आहे, ती अन्यायकारी असून मुख्यमंत्र्यांनी या जमीनविक्रीची चौकशी करावी व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी नाईक कुटुंबीयांनी केली आहे.

वाडी कांदोळी येथे माजी सरपंच श्रीकृष्ण नाईक कुटुंबीयांचे बांधकाम सीआरझेड मध्ये अतिक्रमणकरून केल्याचा ठपका ठेऊन राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार जमीनदोस्त केले होते. त्यानंतर या नाईक कुटुंबीयांवर जमीन बळकावण्याचा आरोप करण्यात आला होता.

सोमवारी संध्याकाळी कांदोळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूजा नाईक, अनुजा नाईक, दयानंद नाईक, हंसा नाईक व इतर सदस्यांनी जमीन बळकावल्याच्या आरोपाचे पुराव्यानिशी खंडण केले आहे.

माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी नाईक कुटुंबियांनी ही जमीन बळकावली होती, असा आरोप केला होता. पण हे आरोप धांदात खोटे असून यात तथ्य नाही. तसेच या जमिनीपैकी एका सर्वे क्रमांकातील भूखंड माजी आमदार फर्नांडीस यांच्या नावावर कसा झाला, असा सवाल पूजा नाईक यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – दिलासादायक निर्णय! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसह रिटायर्ड झालेल्यांना मिळणार वेतनवाढ

गोवा मुक्तीपासून या जागेतील ताबा आमच्या कुटुंबियांकडे आहे. याठिकाणी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस याचे एक क्लब होते. पण नंतर ते लोकांनीच बंद पाडले. यामध्ये आमचा कसलाच हात नाही. आमच्या घरांवर झालेली ही कारवाई राजकीय प्रेरीत असून दिल्लीस्थित बिल्डर सोबत हा जमीनविक्री व्यवहार राजकारण्यांनीच केला आहे, असा आरोप पूजा नाईक यांनी केला.

ज्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली ते 1980 पासून अस्तित्वात होते. त्यास सीआरझेड कायदा लागू होत नाही. जी मंडळी एका रात्रीत घर बांधले असा आरोप करीत आहेत. त्यांनी एका रात्रीत सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करून दाखवावे, असे आव्हान पूजा नाईक यांनी दिले आहे.

हेही वाचा – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पाच वर्षं पगार

आमचे घर हे अनधिकृत होते, तर पंचायत आमच्याकडून कर कुठच्या आधारावर घेत होती. आम्ही सीआरझेडचे उल्लंघन केले असा दावा केला जात असला तर याच ठिकाणी किनारीपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर इतर लोक कसे बांधकामे करतात. त्यांच्या बांधकामांना अभय कसा, असा सवाल करून आमच्या मदतीला नीज गोमंतकियांनी यावे, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

आमचे कुटुंब जमीन बळकावणारे व गुंडगिरी करणारे असते तर कांदोळी गावातील अनेक जमिनी आमच्याकडे असत्या. पण आमच्याकडे अशा जमिनी नाहीत. आमच्यावर राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार कारवाई झाली असे म्हटले जाते, पण आम्हाला कारवाईची पूर्वसूचना दिली गेली नाही. सीआऱझेड अधिकारी व मामलेदार यांच्यात कारवाईबाबत एकमत नव्हते. स्थानिक कुठल्याच लोकप्रतिनिधींनी आम्हाला मदत केली नाही. त्यामुळे या कारवाईमागे कर्ता धनी वेगळाच आहे. तसेच जमीनदोस्त केलेली घराची जागा सपाटीकरणासह जागे सभोवती पत्र्याचे आवरण बिल्डरने घातले. सदर बिल्डरला सीआरझेड कायदा लागू होत नाही का, असा सवाल अनुजा नाईक यांनी उपस्थित केला.

आमचे घर सीआरझेडमध्ये येत असल्याचा ठपका ठेवला गेला. राष्ट्रीय हरीत लवादाने आम्हाला बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. एका सुनावणीत थेट बांधकाम मोडण्याचा आदेश दिला. पोलिस व अधिकार्‍यांच्या समक्ष आमच्या घरातील मौल्यवान सामानाची बिल्डरच्या कामगारांनी चोरी केली, असा आरोप अनुजा नाईक यांनी केला.

आम्ही नीज गोंयकार आहोत. खरे भूमिपुत्र आहोत. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालावे, आम्हाला वार्‍यावर न टाकता न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नाईक कुटुंबियांनी केली.

हेही वाचा – Video | Government Employee | Good News | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही २८% डीए

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!