पेडण्यात घरात शिरलं पाणी; शेतीला आलं नदीचं स्वरूप

इब्रामपूर, चांदेल, हणखणे, हेदुस भागात मोठ्या प्रमाणात नुकसान

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे तालुक्यातील इब्रामपूर, चांदेल, हसापुर, कासारवर्णे, हणखणे, हळर्ण, तळर्ण, तोरसे या भागातील शापोरा आणि तेरेखोल नदीला महापूर आल्यानं परिसरातील शेती-बागायतीला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं वीज उपकरणं निकामी झालीत. रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचे मार्ग बंद झालेत. तसंच यामुळे जनसंपर्क तुटलाय. वीज प्रवाहही खंडित झालाय. काही ठिकाणी गुरांच्या गोठ्यात पाणी शिरल्यानं गुरांना मरण आलंय. इब्रामपूर येथील शेतकऱ्यांना सोसाईटीत सुमारे ८०० लिटर दूध घालता आलं नसल्यानं त्यांना नुकसान सोसावं लागलंय. शेतातील काढून ठेवलेली रोपं, तरवा वाहून गेला. विहिरीला बसवलेले पंप निकामी झालेत. बागायतीतील उभ्या केळी आडव्या झाल्यात. या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.

आजगावकरांनी केली नुकसानग्रस्त भागाची पहाणी

पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी तातडीने या भागाची पहाणी केली. तसंच अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याची सुचना केली. शिवाय सरकारच्या मदतीची वाट न पाहता आजगावकर काही शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर मदत तातडीने आर्थिक मदत पुरवली. यावेळी पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर, पेडणे कृषी अधिकारी प्रसाद परब, जलसिंचन विभागाचे अधिकारी अनिल परुळेकर, सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे अधिकारी नाईक, अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार, पेडणे मामलेदार अनंत माळीक, पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, आबा तळकटकर, ज्ञानेश्वर परब आदी उपस्थित होते.

नुकसान भरपाई देण्याची हमी

आजगावकरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नुकसाग्रस्त शेतकऱ्यांचे अहवाल सादर करण्याची सुचना केली. तसंच मुख्यमंत्री  डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याची यावेळी त्यांनी ग्वाही दिली.

जवळपास ८० हेक्टर शेतीचं नुकसानं

तिळारी धरणाचं पाणी काल रात्री सोडल्यामुळे पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल नदीला पूर आला. नदीकाठच्या गावांना, घरांना धोका निर्माण झाला. रात्रीच पाणी सोडल्यानं अनेकजण संकटात सापडले. जनसंपर्क तुटल्यानं त्यांच्या मदतीसाठी कुणी पोहोचू शकलं नाही. घरात पाणी शिरल्यानं घरातील कडधान्य, तांदूळ तसंच इतर सामानाचं नुकसानं झालं. वीज उपकरणं निकामी ठरली. गतवर्षी झालेलं नुकसान अद्याप मिळालेलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर परत यंदाही लाखो रुपयांचं नुकसानं झालंय. ८० हेक्टर शेतीचं नुकसानं झालं असल्याचा अंदाज कृषी अधिकारी प्रसाद परब यांनी व्यक्त केलाय. त्यात केळी, भातशेती, उस, भेंडी, भाजीपाला यांचा समावेश आहे.

रस्ते पाण्याखाली

चांदेल, बैलपार, हलर्ण, तळर्ण, कासारवर्णे या भागातील रस्त्ये पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं लोकांची बरीच धांदल झाली आहे. लोकांना कामावर जाता आलं नाही. जनसंपर्क तुटल्याने कुणी मदतीला धावून जाणार तर मार्ग बंद होते. बेभरवशाची टेलिफोन सेवाही विस्कळीत झाली.

हा व्हिडिओ पहाः Video | मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!