पाणीच नाही, पेडणेकरांना देऊ कुठून?

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणे : पेडणे तालुक्याला देण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही, त्यामुळे पाणी देऊ कुठून असा अगतिक सवाल पेडणे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता वालसन यांनी केला.
संपूर्ण पेडणे तालुक्यासाठी चांदेल येथील 15 एमएलडी पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. या प्रकल्पातील पंप वारंवार बिघडत असल्याने पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. आता पुन्हा पंप बिघडल्यामुळे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर असे पाच दिवस पूर्ण तालुक्यासाठी अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचे पेडणे पाणी विभागाने जाहीर केले.
हलगर्जीपणाची गय नाही : बाबू
यावर स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणतात, मी सरकारात असलो तरी गप्प बसणार नाही. पाणी पुरवठ्यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा करताना त्यांची गय करणार नाही. पाणी विभागाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा. यावर पाणी विभागाचे अभियंते वालसन म्हणतात, पाणी कुठून आणू? टँकर आहेत कुठे? आणि पाणी कुठले भरणार?
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे म्हणतात, चार दिवसात नवीन पंपाविषयी निर्णय होईल, तोपर्यंत टेंकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले .
चांदेल पाणी प्रकल्पातून 20 ग्रामपंचायती व एक नगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. या प्रकल्पात असलेल्या पंपात वारंवार बिघाड होत असतो आणि दुसऱ्या बाजूने विजेचा लपंडाव सुरु झाला की पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होतो .
…तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा!
आमदार दयानंद सोपटे म्हणाले, तिळारी कालवा स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले, त्या दिवसापासून पाण्याची समस्या सुरु झाली. नवीन पंप आणण्यासाठी सरकारला विनंती केली आहे. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाउसकर, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करणार. तोपर्यंत नागरिकाना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल.
नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेराव
पेडणे पालिका क्षेत्रातील सुर्बानवाडा व परिसरातील नळांना आठ दिवसापासून पाणी येत नाही. अधूनमधून पाणी येते. पण त्याचा थांगपत्ता लागत नाही. पाण्याची समस्या सोडवावी यासाठी सिद्धेश पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पाणी विभागाचे अधिकारी वालसन याना जाब विचारला. नारायण सावळ देसाई, दिलीप पेडणेकर, निर्मल पेडणेकर, सीताबाई पेडणेकर, विठ्ठल पेडणेकर, सज्जन पेडणेकर, ज्ञानेश्वर पेडणेकर, उदय पेडणेकर, उत्तम पेडणेकर, सावित्री पेडणेकर आदी नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी आठ दिवसात ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले .
मुख्यमंत्री फोन घेत नाहीत : दाजी कामत
पेडणे येथील ज्येष्ठ नागरिक दाजी कामत यांनी सांगितले, घरातील नळांना पाणी नाही. मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना फोन केला, तर ते फोन घेत नाहीत. अशा प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी जगावे कसे?