रविवारी संध्याकाळपर्यंत सत्तरी तालुक्यातील पाणी पुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्यता

सध्या पाणी जपून वापरण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सत्तरी तालुक्याच्या जवळपास ७०% गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा गुरुवारी रात्री बंद पडली होती. सदर यंत्रणा पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचे कार्य करून शनिवारी प्रकल्पाची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.

यामुळे वाळपई नगरपालिका क्षेत्रात शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणि रविवारी संध्याकाळपर्यंत सत्तरी तालुक्याच्या इतर गावांमध्ये पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आलाय.

दरम्यान पाण्याची पातळी वाढल्यामुळे सत्तरी तालुक्यातील सावर्डे, गुळेली पाडेली, पैकुळ या पाणी प्रकल्पाच्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झालेला आहे. यामुळे सदर भागातही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या दोन दिवसात पैकुळ वगळता इतर पाणी प्रकल्पाची यंत्रणा जागेवर घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती नाँयल, पाणीपुरवठा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सोमा नाईक आणि दाबोस पाणी प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता प्रशांत गावंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

रविवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हादईचं पाणी गढूळ होतं. यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होताना दिसतोय. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी दिवसभर रात्री उशिरापर्यंत प्रकल्पाची यंत्रणा जागेवर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पाची विद्युत यंत्रणा पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागली. शुक्रवारी संपूर्ण रात्र ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आल्यानंतर शनिवारी सकाळी प्रकल्पाची यंत्रणा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास 5 एमएलडी क्षमतेची यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाळपई नगरपालिकेच्या क्षेत्रात शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा होणार आहे. तर सत्तरी तालुक्याच्या इतर गावांमध्ये रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तूर्तास टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा

दरम्यान याबाबत देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार ज्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाची पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. त्याठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. खासकरून वाळपई नगरपालिका क्षेत्रात टँकरद्वारे पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसापासून सुरू झाला असून नागरिकांची काही प्रमाणात गरज भागविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे .तर काही ग्रामीण भागातही टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

हेही वाचा : दोडामार्गात एनडीआरएफ दाखल

पाडेली, पैकुळ, सावर्डे, गुळेली प्रकल्पाच्या यंत्रणेचं नुकसान

ग्रामीण भागामध्ये २४ तास पाणी उपलब्ध करण्यासाठी या खात्यातर्फे कार्यान्वित करण्यात आलेल्या सावर्डे गुळेली पाडली व पैकुळ या चारही प्रकल्पाच्या यंत्रणेची नुकसान झालंय. या सर्व प्रकल्पाची यंत्रणा पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे त्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे पैकुळ वगळता इतर प्रकल्पाची यंत्रणा दोन दिवसात जागेवर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल. पैकुळ येथील पूल कोसळल्यामुळे सदर ठिकाणी जाणं शक्य नाहीये. यामुळे सदर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यताय. त्यामुळे या भागातील लोकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : समुद्राच्या पाण्याला कोण रोखणार?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!