प्रत्येक मतदारसंघात आता ‘वॉर रूम’

सरकारचे कोरोनाविरोधात युद्ध

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. एकीकडे नव्या बाधीतांची संख्या वाढतेय आणि दुसरीकडे मृत्यूदर घटत नाहीए. या अनुषंगाने आता राज्य सरकारने कोरोनाविरोधात युद्ध पुकारलंय. प्रत्येक मतदारसंघासाठी इन्सिडंट कमांडर नियुक्त करून ‘वॉर रूम’ स्थापण्याचा निर्णय घेतलाय. या वॉर रूमच्या सहाय्याने चोविस तास परिस्थितीवर नजर ठेवली जाईल. प्रत्येक गरजूपर्यंत आवश्यक मदत पोहचवली जाईल. कुठल्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. लॉकडाऊनबाबत पुढील काही दिवसांत निर्णय होईलच. परंतु प्रत्येक नागरीकाने घरी राहणं पसंत केलं आणि गरजेशिवाय बाहेर न पडण्याचं धोरण अवलंबलं तर आपोआप परिस्थिती आटोक्यात येईल, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्यात शहरांसह ग्रामीण भागांतही कोरोनाचा तांडव

आमदारांची लॉकडाऊनची मागणी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गुरूवारी रात्री सर्व आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे बैठक घेतली. या बैठकीत बहुतांश आमदारांनी काही काळासाठी संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली. वास्तविक कोविड निर्बंध हे लॉकडाऊनपेक्षा कडक आहेत. पण तरीही लॉकडाऊनबाबत सरकार निश्चितच विचार करेल, असंही डॉ. सावंत म्हणाले. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि त्यांचे आमदार एकाही बैठकीला हजर राहिले नाहीत आणि वरून आमदारांची बैठक बोलवा, अशी मागणी करताहेत. आपला आमदारांसोबतचा संवाद सुरूच आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढील दोन ते तीन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. परंतु जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच राहणार आहे तसंच अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्या

दीनदयाळचे आपोआप नुतनीकरण

दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेची कार्ड नुतनीकरण न केलेल्यांना मोठा दिलासा सरकारने दिलाय. ही सगळी कार्ड आपोआप नुतनीकरण केली जातील आणि लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयांत जावं लागणार नाही, असं ते म्हणाले. सर्व सरकारी इस्पितळात कोविडचा उपचार मोफत आहे. खाजगी इस्पितळांतील 80 टक्के खर्च सरकार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. सुमारे अडीच लाख कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

वेळीच इस्पितळात दाखल व्हा

सध्याच्या परिस्थितीत इस्पितळात दाखल होऊन चोविस तासांत मृत्यू येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याचा अर्थ हे लोक इस्पितळात वेळीच दाखल होत नाहीत. विशेष करून तरूणांचा यात मोठी संख्या आहे. लोकांनी वेळीच इस्पितळात दाखल होण्याची गरज आहे. इस्पितळातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा सखोल अभ्यास करून अखंडीत पुरवठा होईल याची काळजी सरकारने घेतलीए. लवकरच दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारले जातील. केंद्र सरकारच्या मदतीने 71 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेंटर्स जीएमसीत देण्यात आलेत. सुपरस्पेशलिटी विभागात रूग्णांना हलविण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात स्टेपअप इस्पितळ उभारण्यात येणार असून त्यासाठीची तयारी सुरू आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

corona death 800X450

निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती अयोग

हायकोर्टाच्या निर्णयाबाबत सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार. प्रत्येकाकडे निगेटिव्ह प्रमाणपत्र मागणं अशक्य आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडे प्रत्येकवेळी निगेटिव्ह प्रमाणपत्र मागावं लागलं तर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडेल. सगळी व्यवस्था बिघडू शकेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!