सिंधुदुर्गातील वाघिण पोचली गोव्यातील म्हादईत अभयारण्यात

पश्चिम घाटामध्ये अस्तित्वात असलेल्या सह्याद्री-कोकण व्याघ्र भ्रमणमार्गाचं महत्त्व अधोरेखित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी जंगल क्षेत्राच्या आसपासच्या भागात अधिवास असणाऱ्या एका वाघिणीने आता गोव्यातील ‘म्हादई अभयारण्या’मध्ये आपले बस्तान बसवलं आहे. चार वर्षांपूर्वी या वाघिणीचा तिलारीच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये अधिवास होता. आता या वाघिणीने ‘म्हादई अभयारण्या’मध्ये स्थलांतर केलं असून ती सुखरुप असल्याचंही समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे यामुळे पश्चिम घाटामध्ये अस्तित्वात असलेल्या सह्याद्री-कोकण व्याघ्र भ्रमणमार्गाचं महत्त्व अधोरेखित झालं आहे.

हेही वाचाः आर्चबिशप फेलिप नेरी फेर्रावा यांनी घेतली नवनिर्वाचित राज्यपालांची भेट

सह्याद्री-कोकण व्याघ्र भ्रमणमार्गाचं महत्त्व अधोरेखित

साधारण चार वर्षांपूर्वी तिलारीच्या आसपास आढळलेली ‘TT 7’ ही वाघिणी आता म्हादई अभयारण्यात आढळल्याने सह्याद्रीतील वाघांचे स्थलांतर होत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे वाघांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी दोन राज्यांमध्ये समन्वय असणंही आवश्यक असल्याचं नमूद झालं आहे. तसंच पुन्हा एकदा सह्याद्री-कोकण व्याघ्र भ्रमणमार्गांचे अस्तित्वही अधोरेखित झालं आहे.

हेही वाचाः RAIN UPDATE | उद्या पुन्हा मुसळधार

२०१८ मध्ये कॅमेराबद्ध झालेला नर वाघ मे, २०२० मध्ये ‘काली व्याघ्र प्रकल्पा’त आढळला

‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’मध्ये मे, २०१८ मध्ये कॅमेराबद्ध झालेला नर वाघ मे, २०२० मध्ये कर्नाटकातील ‘काली व्याघ्र प्रकल्पा’त आढळून आला होता. त्यावेळी त्याने २१५ किमीचे स्थलांतर केले होते. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’मधील वाघ दक्षिण भारतामध्ये स्थलांतर करत असल्याचा हा पहिलाच पुरावा होता. परिणामी पश्चिम घाटामध्ये अस्तित्त्वात असलेल्या व्याघ्र भ्रमणमार्गाचं महत्त्वही लक्षात आलं होतं. आता अशाच एका प्रकारचे व्याघ्र स्थलांतर समोर आलं आहे. ‘तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा’च्या आसपासच्या भागामध्ये २०१८ साली कॅमेऱ्यात छायाचित्रित केलेली एक वाघिणी ३० जून, २०२१ रोजी गोव्यातील ‘म्हादई अभयारण्या’मध्ये आढळून आली आहे. चिपळूणची ‘सह्याद्री निसर्ग मित्र संस्था’ (एसएनएम) आणि ‘बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) संयुक्त विद्यामाने राबवण्यात आलेल्या ‘इ-मॅमल’ प्रकल्पाअंतर्गत काही कॅमरा ट्रॅप तिलारीच्या आसपासच्या भागामध्ये २०१८ साली लावण्यात आले होते. या कॅमेरा ट्रॅपमध्ये मार्च, २०१८ मध्ये या वाघिणीची छायाचित्र टिपण्यात आलं होतं. त्यानंतर मे, २०१८ मध्ये ही वाघिणी चोर्ला घाटामध्येही आढळून आली होती. जवळपास चार वर्षानंतर ३० जून, २०२१ रोजी या वाघिणीचं छायाचित्र ‘म्हादई अभयारण्या’च्या दक्षिण भागामध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपण्यात आलं आहे.

हेही वाचाः येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा देणार? वाचा कारण काय?

‘TT 7’ या वाघिणीचं छायाचित्र हे म्हादईतील वाघाच्या छायाचित्रीशी जुळलं

पंजाबी यांनी ‘म्हादई अभयारण्या’मधून नुकतेच प्रसिद्ध झालेले वाघाचे छायाचित्र हे महाराष्ट्राच्या सह्याद्रीमधील आढळणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांशी जुळवून पाहिले. त्यावेळी तिलारी जंगल क्षेत्राच्या आसपास अधिवास असणाऱ्या ‘TT 7’ या वाघिणीचं छायाचित्र हे म्हादईतील वाघाच्या छायाचित्रीशी जुळलं. दोन्ही छायाचित्रांमधील वाघाच्या अंगावरील पट्ट्यांची रचना तपासून त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये ‘TT 7’ ही वाघिणी सुखरुप असून तिने म्हादई अभयारण्यामध्ये आपले बस्तान बसवलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!